मास्क न लावणार्‍यांना ग्रामपंचायतींचा दणका ; बोर्लीपंचतनमध्ये तीन दिवसांत 12 हजारांची दंडवसुली



अभय पाटील/बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन बाजारपेठ बहुतांश प्रमाणात सुरु झाली आहे. बाजारपेठेमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून मास्क न वापरणार्‍या, सामाजिक अंतर न ठेवणार्‍या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या बेजबाबदार नागरिकांकडून ग्रामपंचायतीने दंड आकारण्यास सुरुवात केली आहे.  गेल्या तीन दिवसांत 12 हजारांचा दंड ग्रामपंचायतीने वसूल केला आहे. 
बोर्लीपंचतन बाजारपेठ मागील 10 दिवसांपासून उघडण्यात आली आहे. उपहारगृहे, छोट्या टपर्‍या, स्ट्रीट फूड्स दुकाने, बिअर बार, शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी, ब्युटी पार्लर, सलून वगैरे वगळता बहुतांश दुकाने चालू करण्यात आली आहे. बोर्लीपंचतन ही आजूबाजूच्या सुमारे 25 छोट्या गावांची व खेडेगावांची बाजारपेठ आहे. नेहमीच या बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी असते. बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीची कोरोनाबाबत सुकाणू समिती सथापन करण्यात आली आहे. 

या समितीच्या निर्णयानुसार मच्छीमार्केट व इतर छोटे विक्री व्यवसायिकांना तीन दिवसांपूर्वी होळीच्या पटांगणामध्ये विक्रीसाठी बसविण्यात आल्याने मुख्य मार्केटमधील गर्दी काही प्रमाणात कमी करण्यात यश आले; परंतु मार्केटमध्ये वावरताना सोशल डिस्टंसिंगचा वापर ग्राहक करताना दिसत नव्हते तर काही मास्क न लावता फिरणे, दुकानांमध्ये नियम न पाळणे अशा तक्रारी येत होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 

रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी निर्गमित केलेल्या कोरोना आदेशानुसार कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणार्‍या व्यक्तीस 500 रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यास 500 रुपये, दुकानासमोर मार्किंग न करता दुकानासमोर आलेल्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर नसणे यामुळे दुकानदारास 1 हजार रुपये तर ग्राहकास 200 रुपये दंड आकारण्याचा धडाका बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीने सुरू केला. 

या दंड वसुलीसाठी पथक नेमण्यात आले असून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य- सदस्या, पोलीस पाटील, समाजाध्यक्ष, पोलीस कर्मचारी अशांची नेमणूक करण्यात आली आहे. तीन दिवसांमध्ये या पथकाने 12 हजार रुपयांचा दंड वसूल केला असून  दंड वसुलीबाबत ग्रामपंचायतीची पावती देण्यात येत असल्याची माहिती सरपंच नम्रता गाणेकर यांनी दिली. 

ग्रामपंचायत कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असून ग्रामस्थांनी तसेच बाजारपेठेमध्ये येणार्‍या इतर गावातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे तर सार्वजनिक ठिकाणी सुरु केलेली कारवाई सुरूच राहणार आहे.
- दिनेश रहाटे,  ग्रामविकास अधिकारी, बोर्लीपंचतन 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा