वर्षभराची विविध विभागाची उद्धिष्ट साध्य करत मार्च अखेर दमछाक होणाऱ्या ग्रामसेवकांसाठी यंदाचे मार्च अखेर नोकरीची परीक्षा घेणारे ठरले. जानेवारी, फेब्रुवारी च्या दरम्यान जगात हाहा:कार माजविलेल्या करोना विषाणूचे संकट शहरासह ग्रामीण भागावर आले ते मार्च मध्ये. करोना विषाणूचा प्रादूर्भाव, लक्षणे, उपाययोजना याबाबत सर्वत्र पसरलेले समज, गैरसमज या साऱ्या गोष्टींना योग्य समयसूचकता दाखवत योग्य उपाययोजनेसह सामोरे जाण्याचा तो काळ ग्रामीण भागासाठी निश्चितच कठीण होता. लॉकडाऊन, संचारबंदी, कलम १४४,आपत्ती व्यवस्थापन कायदा आदीमुळे नागरिक भयभीत झाले होते, अशा वेळी प्रशासनाच्या सूचना, वरिष्ठांचे मार्गदर्शन, पदधिकारी यांची संयमी साथ व स्वतःतील कसब पणाला लावून ग्रामसेवकांनी करोना विरुद्धचे या युद्धात स्वतःला सिद्ध केले आहे.
परदेशातून आलेले नागरिक, राज्याबाहेरून आलेले नागरिक, राज्यातून आलेले नागरिक यांची नोंद घेणे त्यांची प्राथमिक तपासणी करणे, लक्षण असलेल्याना होम क्वारंटाईन करणे, क्वारंटाईन करणे, नियंत्रण कक्षाची स्थापना करणे, धूरफवारणी, निर्जंतुकीकरण, परिसर स्वच्छता, करोना प्रतिबंधात्मक जनजागृती, सॅनिटायझर व मास्क वाटप, नागरिकांना दैनंदिन वस्तू गावातच उपलब्ध करून देणे, त्यासाठी सामाजिक अंतर राखून ठेवणे तसेच परराज्यातील मजूर व गावातील निराधार, गरजू गरीब कुटुंबासाठी निवास, जेवण, शौचालय,पाणी आदी सुविधा निर्माण करणे, या सर्वच आघाड्यांवर ग्रामसेवकांनी दिलेल्या योगदानाची इतिहासात नोंद होईल, यात शंकाच नाही.
करोना प्रतिबंधाच्या या कामाला स्वतःचा जीव धोक्यात घालून कृतीशील पाठबळ देत पुढे आलेले सरपंच, उपसरपंच, निवडक ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायतींचे कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना घेऊन नागरिकांची घेतलेली काळजी,त्यांना दिलेला धीर, आधार हे सारं कौतुकास्पद आहे. या सर्व कामात ग्रामसेवकांनी पुढाकार घेवून निर्धारपूर्वक व जबाबदारीने केलेले काम निश्चित प्रशंसनीय आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक हेच सर्वांना बरोबर घेवून काम करणारे सेनापती ठरले आहेत, हे आता आपल्याला मान्य करायला हवे.
गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता शांतता, अवदशा येईल देशा या उक्ती प्रमाणे आपलं गाव करोना मुक्त होऊन सर्वांगीण विकासासाठी पुन्हा सिद्ध होत आहे. करोना विरुद्धच्या या लढ्यात थकून न जाता यशस्वी शाश्वत ग्रामविकासासाठी आज धीराने, जिद्दीने, संयमाने , आत्मविश्वासाने सज्ज झालेल्या ग्रामसेवकांचा मला सार्थ अभिमान वाटतो. खरंतर पंचायत राज व्यवस्थेत ग्रामवेसक हा ग्रामविकासाचा कणा आहे, हे त्यांनी स्वकर्तृत्वाने सिद्ध केले आहे. ते क्रेडिट घेण्याच्या भानगडीत न पडता सर्वांना बरोबर घेऊन निर्धारपूर्वक पुढे जात आहेत. सतत येणाऱ्या नवनवीन योजना, कार्यक्रम व त्यासाठी नियोजन, अंमलबजावणी ते योजनेची यशस्वी फलनिष्पत्ती यासाठी आपले सर्व कसब पणाला लावत आहेत. पदाधिकारी, अधिकारी ते नागरिक यांचा दैनंदिन संपर्क, भेटी व मार्गदर्शन यातून त्यांना हे यशाचं गमक कळलं असून, ते याचं श्रेय सामूहिक प्रयत्नांना देतात. हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. स्वतः विविध चांगल्या-वाईट प्रसंगांना दररोज सामोरे जाऊन आपली सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेऊन, शासन निर्णयांशी एकनिष्ठ राहून स्वतःचे उतरदायित्व निभावत आहेत. सर्वच कामांना 100 टक्के न्याय देण्याची त्यांची ही जिद्द, परिश्रम एका यशस्वी धुरीनालाही लाजवेल अशीच आहे. अष्टपैलू वृत्तीमुळे नागरिक, पदाधिकारी, अधिकारी यांच्या अपेक्षा , कुटुंबियांच्या इच्छा यांची स्वप्नपूर्ती यामध्ये त्यांची होणारी दमछाक आकलनापलीकडची आहे. यामुळे आरोग्याची, कुटुंबाची होणारी हेळसांड याची गाऱ्हाणी त्यांनी कधीच कोणाकडे न मांडल्याने मानसिक ताणाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. लढाई अजून संपली नाही. पण सामूहिक प्रयत्नाने आपण ती निश्चित जिंकणार आहोत, याचा शासनास विश्वास वाटतो आहे.
करोना विरुद्धच्या या लढ्यातील या कार्याबद्दल सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी बंधूं भगिनींच्या जिद्दीला अन् त्यांच्या या जिद्दीला, मेहनतीला पाठबळ देणारे, प्रोत्साहन देणारे तसेच या संकटकाळात सर्व आघाडयांवर खंबीर नेतृत्व करणारे आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर,पनवेल महानगरपालिका गणेश देशमुख या सर्वांना माझा सलाम…!
(लेखन :-जयवंत गायकवाड)
(संपादन :- मनोज शिवाजी सानप)
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा माहिती अधिकारी,जिल्हा परिषद,
रायगड-अलिबाग
(संपर्क क्र.9422495846)
Post a Comment