श्रीवर्धन : जीवना कोळीवाडा बंदर निर्मनुष्य ; मंगळवार पर्यंत मच्छिमारी व मासेविक्री पूर्णपणे बंद राहणार


मंगळवार मच्छिमारी व मासेविक्री पूर्णपणे बंद राहणार

भारत चोगले : श्रीवर्धन 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील जीवना कोळीवाड्यातील मच्छिमारांनी मासेमारी व मासेविक्री बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंगळवार (21 एप्रिल) पर्यंत मच्छिमारी व मासेविक्री पूर्णपणे बंद राहणार असून, बोटी किनार्‍यावर नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत.
रविवारपासून जीवना कोळीवाडा येथील मासेमारी व मासेविक्री पूर्ण बंद आहे. गावामधील छोटी मोठी किराणामालाची दुकानेसुध्दा बंद ठेवण्यात आली आहेत. मंगळवारपर्यंत कोणीही घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही मच्छिमाराने आपल्या नौकेच्या कामासाठी बाहेर पडू नये, यासाठी खालचा जीवना कोळीवाडा व वरचा जीवना कोळीवाडा येथील मुख्य नाक्याजवळ गावातील प्रमुख दोन ते तीन व्यक्तींचा सतर्क पहारा ठेवण्यात आला आहे.
रविवारी पहिल्याच दिवशी जीवना कोळीवाडा येथील नागरिकांचा बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील भोस्ते या गावात वरळी येथून आलेल्या पाच जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची गांभर्याने दखल घेत, जीवना कोळीवाडा येथील मच्छिमारांनी मच्छिमार व गावकरी यांच्या सुरक्षितेसाठी मासेमारी व मासेविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे दोन्ही कोळीवाड्यामधील रस्त्यावर शुकशुकाट पसरला असून, नेहमीच गजबजलेले जीवना बंदर निर्मनुष्य दिसत आहे. तर सर्व नौका या किनार्‍यावर नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा