करोनाशी संघर्ष करीत असताना भविष्यातील पाणीपुरवठ्याचेही नियोजन करावे - पालकमंत्री कु.आदिती तटकरे


करोनाशी संघर्ष करीत असताना भविष्यातील पाणीपुरवठ्याचेही नियोजन करावे ;जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या सूचना

प्रतिनिधि म्हसळा लाईव्ह 
करोनाशी संपूर्ण देश, राज्य, जिल्हा संघर्ष करीत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करायला हवे. जीवाच्या भीतीने जिल्ह्यात मुंबई व इतर ठिकाणचे बरेच लोक आपापल्या गावाकडे आले आहेत. त्यामुळे साहजिकच पाण्याचा वापरही वाढला आहे. अशा परिस्थितीत भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन आतापासूनच करायला हवे, अशा सूचना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.
      जिल्हा परिषद प्रशासन करोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद येथे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
        यावेळी जिल्हा परिषद, रायगड उपाध्यक्ष तथा शिक्षण आरोग्य सभापती सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, शितल पुंड, मुख्य वित्त व लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरूट,कार्यकारी अभियंता (बांधकाम) श्री.बारदेस्कर, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) श्री.कोळी हे मोजकेच अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजर वापर, स्वच्छता या सर्व बाबींचे काटेकोर पालन करण्यात आले.
     पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, या काळात गावांकडे वाढलेली जनसंख्या पाहता पाण्याचा वापर होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे काही महिन्यानंतर होणारी संभाव्य पाणीटंचाई ही काही महिने आधीच सुरू होण्याची दाट शक्यता आहे. याकरिता खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने सादर करावेत. आतापासूनच पाणी स्त्रोत, पाणीसाठा त्यांची स्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे भविष्यातील पाण्याबाबत नियोजन करावे.
        जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये 108 ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री कु. तटकरे यांनी याबाबत सूचना केली की,ज्या तालुक्यात एक किंवा दोन पेक्षा जास्त 108 ॲम्बुलन्स असतील तर त्या तालुक्यातील एक ॲम्बुलन्स तातडीने ज्या तालुक्यात ॲम्बुलन्स नाही तिथे रवाना करावी. 
      तसेच जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ज्या मोठ्या रस्त्यांना यापूर्वीच मंजूरी मिळालेली आहे, ती कामेही तातडीने सुरू करावीत, जेणेकरून भविष्यात पाण्याचे टॅंकर्स पाठवताना रस्त्यांमुळे अडचण निर्माण होणार नाही.     
      अन्नधान्य वाटपाबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्वयंसेवी संस्थांनाही आवाहन केले आहे की,अन्नधान्य वाटप करताना शिजवलेले अन्न न देता शिधा वा जीवनावश्यक वस्तू द्याव्यात.
      सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी करोना विषाणूचा लढा देताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी,असे सांगून पालकमंत्री कु.तटकरे यांनी करोना विरोधात खंबीरपणे लढा देत असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले तर नागरिकांनी करोना विषाणूबाबत काळजी करू नका तर काळजी घ्या, अनावश्यक घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टंन्सिंग,सॅनिटायजरचा वापर, स्वच्छता या बाबीही कटाक्षाने पाळा,असेही आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा