म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
देशात आणि राज्यात वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारच्या उपाय योजना राबवित आहे. शासकीय यंत्रणेतील डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस, महसूल विभाग, शिक्षण विभाग, पंचायत समिती अशा सर्वच महत्वाच्या विभागांचे अधिकारी व कर्मचारी स्वतःचे जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कोरोनाचे महामारी विरुद्ध लढा देत आहेत. कोरोनाचे पार्श्वभूमीवर या सर्वच शासकीय कर्मचारी वर्गाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारे सॅनिटायझरचे मोफत वाटप म्हसळा तालुक्यातील आंबेत गणाचे जिल्हा परिषद सदस्य तथा रायगड जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती श्री.बबन मनवे यांनी स्वखर्चाने केले आहे.
तालुक्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, तहसील कार्यालय व महसूल विभागाचे कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचारी या सर्वांना बबन मनवे यांनी सॅनिटायझरचे वाटप केले.
कोरोना महामारीला रोखण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. गावागावात फिरून कोरोना विषयी जनजागृती करण्याचे काम अधिकारी व कर्मचारी चांगल्या पद्धतीने करीत असल्याचे दिसून येत आहे. या सर्वच शासकीय कर्मचारी वर्गाचा थेट नागरिकांशी संपर्क येत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतानाच स्वतः च्या देखील आरोग्याची काळजी घेतली पाहिजे अशी सूचना सभापती मनवे यांनी कर्मचाऱ्यांना केली.
तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयात सॅनिटायझरचे वाटप केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिप सभापती बबन मनवे यांचे आभार मानले.
यावेळी जिप सभापती बबन मनवे यांच्या समावेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष समिर बनकर उपस्थित होते.
Post a Comment