◆ समाजसेवक, विविध संघटनांकडून होत आहे मदत..
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
कोरोना व्हायरसच्या आजाराने थैमान घातल्यामुळे राज्यात संचार बंदी तसेच देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाचे विषाणू रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्टर, नर्स रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. तर या विषाणूंचा फैलाव होऊ नये व परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महसूल विभाग, पंचायत समिती, नगरपंचायत, शिक्षण विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी डोळ्यात तेल घालून नागरिकांच्यामधे जनजागृती करताना दिसत आहेत. संचारबंदी काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून चोख पणे कामगिरी बजावत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 14 एप्रिल पर्यत लॉकडाऊन घोषित केल्यामुळे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य होत नाही किंबहुना कोरोनाचे विषाणू रोखण्यासाठी नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन शासनाकडून होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात नोकरी, उद्योग, व्यवसाय, लघु उद्योग व घरगुती व्यवसाय बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे शासनाचे आदेश असल्याने मेस्त्री, गवंडी, सुतार, पेंटर अशी छोटी मोठी कामे करणारे कुशल व अकुशल कारागीर आणि कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने अनेक नागरिक चिंतेत आहेत.
तालुक्यात लॉकडाऊन व संचार बंदी परिस्थितीचा विचार करून तसेच दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या तालुक्यातील खेडेगावातील गोरगरीब जनतेच्या दळण वळण साधनांच्या अडचणी व आर्थिक स्थिती लक्षात घेऊन काही सामाजिक संघटना, दानशूर समाजसेवक यांच्या पुढाकाराने "एक हात मदतीचा..." म्हणून अनेक शेकडो हात लॉकडाऊनच्या काळात मदत करण्यासाठी पुढे सरसावले असून नियोजनबद्ध रित्या खेडेगावात जीवनावश्यक वस्तू कडधान्य व इतर घरगुती वस्तूंचा पुरवठा करीत आहेत.
नागरिकांना मदत करण्यासाठी पत्रकार निकेश कोकचा व मित्र परिवार, नईम दळवी व कोकण किनारा मित्र मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दीक इनामदार व जनता की आवाज ग्रुप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समिर बनकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही तालुका पदाधिकारी, जमीर नझीर व फ्रेण्डस ग्रुप, जैन समाज मित्र मंडळ, यांसारखे समाजसेवक, पदाधिकारी व मंडळ तालुक्यातील तहसीलदार शरद गोसावी, गटविकास वाय एम प्रभे, नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज उकिर्डे या अधिकारी वर्गाच्या सहकार्याने गावागावात वाडी वस्तीवर आदिवासी वाडी व काही गावातील गोर गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तू तांदूळ, डाळ, गव्हाचे पीठ, साखर, चहापावडर, गोडेतेल, कांदे, बटाटे, लसूण, खोबरे, मीठ, मसाले, साबण, बिस्किटे, इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करून गोरगरिबांना दिलासा देण्याचे काम करीत आहेत. देशात आणि राज्यात आलेल्या कोरोनाचे महामारी संकटात गोरगरिबांना मोफत अन्नधान्य व इतर वस्तू वाटप करीत असल्याने सर्वच दानशूर व्यक्ती, समाजसेवक, व सामाजिक संघटना यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
Post a Comment