म्हसळ्यात जे.एम.म्हात्रे कंपनीचे रस्त्याचे खुलेआम काम सुरू


● जे.एम.म्हात्रे कंपनीला लॉकडाऊन व संचार बंदी कायदा लागू होत नाही का.? 

● कोरोनाचे पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

● साईटवर परराज्यातील कामगार करतात काम

● काम कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे..?


टीम म्हसळा लाईव्ह

संपूर्ण जगभरासह देशात (कोव्हीड -19) कोरोना महामारीचे संकट असताना देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. अनेक छोटे मोठे उद्योग, व्यवसाय बंद आहेत. अनेक लोक उपासमारीने हैराण असून जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश आहेत मात्र दिघी म्हसळा माणगाव रस्त्याचे ठेकेदार जे.एम.म्हात्रे यांनी बाहेरून कामगार आणून रस्त्याचे खुले आम काम सुरू केले आहे. एकीकडे गावातील लोकांना स्वतःच्या घरचे काम करण्यासाठी बंदी आहे पावसाळा महिन्याभरावर येऊन ठेपला असून सर्व सामान्य जनतेची शेतीची घरची कामे खोळंबली आहेत. सर्व सामान्य नागरिक आणि हातावर पोट असणारे आज कोरोनाच्या भीती मुळे घरात बसून आहेत मात्र जे.एम म्हात्रे कंपनी खुलेआम तालुक्याच्या बाहेरून पनवेल व इतर शहरातून कामगार आणि यंत्रणा आणून काम करत आहे. कामाच्या ठिकाणी आणलेल्या कामगारांची सविस्तर माहिती अथवा त्यांची कुठलीही आरोग्य टेस्ट घेतली जात नाही.
  जे.एम.म्हात्रे कंपनीला ना कोरोनाची भीती आहे ना स्थानिक प्रशासनाची त्यामुळे सामान्य नागरिकांची तर भीती मुळीच वाटत नसणार त्यामुळे कंपनीला भीती फक्त आपल्या आर्थिक नुकसानीनीच आहे की काय असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. सद्यस्थितीत हे काम कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे...?
  जे.एम.म्हात्रे कंपनीने तालुका प्रशासनाला वेठीस धरून सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. तालुक्यातील शहरातून मुख्य रस्त्यावरून पोलीस यंत्रणा, तहसील, महसूल अधिकारी अशा प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या डोळ्या समोरून 50 ते 100 कामगार (नागरिक) एका डंपर गाडी मध्ये भरून कामाच्या ठिकाणी कामगारांची वाहतूक होते मग त्या कंपनीला संचार बंदी कायदा लागू होत नाही का असा सवाल आज नागरिक करत आहेत. या प्रकरणी मा.जिल्हाधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून सदर कंपनीचे काम बंद करावे अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे.

जे एम म्हात्रे कंपनीच्या गाड्या आणि पुलाचे काम कसे काय सुरू आहे याबाबत म्हसळा तहसील कार्यालयात श्री भिंगारे नायब तहसीलदार यांना विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आणि तुम्ही जिल्हाधिकारी यांना विचारा आम्हाला काही विचारू नका असे उत्तर दिले .कंपनीने काम थांबवावे म्हणून मा. मुख्यमंत्री नाम. श्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे.
श्री. महादेव पाटील, तालुका प्रमुख, शिवसेना

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जे.एम म्हात्रे कंपनीच्या वाहतुकीला राजरोसपणे परवानगी दिली जात असेल तर सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू,औषधे आणि  अन्य बाबींसाठी ग्रामीण भागातून शहरापर्यंत येण्यासाठी पोलिसांनी विना व्यत्यय परवानगी द्यावी - ग्रामस्थ

गेल्या २ दिवसांपासून मेंदडी परिसरात दिघी-माणगाव महामार्गाचे काम परत एकदा सुरू झाले आहे. मेंदडी शिवाजीनगर येथील रस्त्यालगत असणाऱ्या घरांना सबंधित कंपनीच्या सतत चालणाऱ्या अवजड वाहनांमुळे धुराळ्याचा प्रचंड त्रास होत आहे. कंपनी व्यवस्थापनाला वेळोवेळी कल्पना देवून पण ते रस्त्याला पाणी मारण्याबाबत सतत दुर्लक्ष करीत आहेत. सद्याच्या  या महामारीमुळे मुळातच नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना आणि आपल्या भागातील अपुरी आरोग्य सेवा पाहता या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालावे असे - महेश धर्मा पाटील (मेंदडी)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा