श्रीवर्धन : सध्या सर्वत्र संचारबंदी लागू असतांनाही सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून व्हिडीओ क्लीप
तयार केल्याबद्दलचा गुन्हा श्रीवर्धन पोलीस स्टेशनला दि. 10 एप्रिल 20 रोजी दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सध्या देशात सर्वत्र संचारबंदी लागू असतांनाही श्रीवर्धन तालुक्यातील निगडी गौळवाडी येथील 17 इसमांनी मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन करुन दि. 8 एप्रिल 20 रोजी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून व्हिडीओ क्लिप टिक टॉक तयार केली.
हे कृत्य त्यांनी कोरोना विषाणुसंबंधीत रुग्ण या भागात आढळण्याची शक्यता असतांना, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने मास्कही न लावता केले आहे. त्यांनी मानवी जीवित व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करुन संसर्ग पसरविण्याची व हयगयीची घातक कृती करुन शासनाच्या आदेशाचा भंग केला आहे.
म्हणून श्री. तुकाराम स.महाडिक (पो. ह.श्रीवर्धन) यांच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा भा. दं. वि. सं. कलम 188,269, 270 इतर भाग 6 व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब, महाराष्ट्र कोविद-19 उपाययोजना 2020 चे कलम 5, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 3713/135 अन्वये दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात श्री. सिद्धेश शांताराम महाडिक, प्रसाद रामचंद्र साबळे व अन्य 15 असे एकूण 17 आरोपी आहेत. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोसई.श्री.खिरड हे पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद बाबर यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.
Post a Comment