भारत चोगले : श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यात भोस्ते येथील एका रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर भोस्ते गाव व 3 किलोमीटरचा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 27 व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
या सर्वांची पनवेल येथील ग्रामविकास भवन येथे तपासणी होणार असून 20 पुरुष तर 7 महिलांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये एक डॉक्टर, पॅथॉलॉजी लॅबचे कर्मचारी, रिक्षाचालक, मित्र आणि नातेवाईक यांचा समावेश आहे. श्रीवर्धन भोस्ते गाव हे पूर्ण सील केले आहेत. त्या गावाचा तीन किलोमीटरचा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तर 5 किलोमीटर अंतरापर्यंत श्रीवर्धन पोलीस ठाणे मार्फत यांनी सतर्क पहारा ठेवण्यात आला आहे.
संपूर्ण भोस्ते गाव व परिसराचे औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता सहकार्य करावे, असे आवाहन श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी केले आहे. तसेच या रुग्णाच्या इतरही कोणी संपर्कात आला असेल तर स्वतःहून पुढे येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Post a Comment