कंपन्यांनी सामाजिक दायित्व निभवावे- माजी आमदार पंडित पाटील

- निवासी उपजिल्हाधिकार्‍यांशी चर्चा

। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग परिसरात असलेल्या मोठ्या उद्योग व कंपन्यांनी कोरोनाच्या संकटसमयी सामाजिक दायित्व निभवावे. या कंपन्यांना स्वयंस्फूर्तीने सामाजिक भान येणार नसेल तर प्रशासनाने त्यांना त्याबाबत जाणीव करून द्यावी, अशी अपेक्षा माजी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केली आहे. अलिबाग - मुरुड परिसरातील मोठ्या उद्योगांनी परिसरातील ग्रामपंचायतींना आरोग्य व स्वच्छताविषयक सुविधा, उपकरणे उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांचेशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. अलिबाग, मुरुड परिसरात अनेक मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्या उद्योगांची व्याप्ती खूप मोठी असल्याने जिल्हा प्रशासनाने या कंपन्या संचारबंदीच्या काळातसुद्धा सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे. जेएसडब्ल्यू, रिलायन्स आदी कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी हजारो कामगार परप्रांतातून आणले जातात. कंपन्यांच्या परिसरात किंवा वसाहतींमध्ये अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने उपलब्ध आहेत. मात्र, कंत्राटदारामार्फत येणार्‍या कामगारांसाठी निवासाची कुठलीही व्यवस्था नाही. हे कामगार कंत्राटदाराने उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणी किंवा अलिबाग, पोयनाड, पेझारी, साळाव, रेवदंडा आदी ठिकाणी दाटीवाटीने राहतात. एकाच खोलीत पाच ते दहा कामगार राहतात, त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नसते. तसेच या कामगारांना दररोज कंपनीत कामावर बोलाविले जाते.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात व राज्यात वेगाने होत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येतात. ग्रामपंचायतींकडून कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासह गावात स्वच्छता ठेवण्यात येत आहे. मात्र, परप्रांतीय कामगारांच्या गर्दी असलेल्या वसाहती, त्यांची संख्या, त्यांच्याकडून होणारी अस्वच्छता याचा ताण ग्रामपंचायतींवर आला आहे. ग्रामपंचायतींकडे असलेल्या साधन - सुविधा आणि मनुष्यबळ मर्यादित आहे. अशा परिस्थितीत हजारो परप्रांतिय कामगारांमुळे ग्रामपंचायतींचा भार वाढला आहे. त्यामुळे ज्याठिकाणी मोठ्या संख्येने परप्रांतिय कामगार राहतात, त्या ग्रामपंचायतींना संबंधित उद्योगांनी मास्क, जंतुनाशके, फवारणी यंत्रे, स्वच्छतेसाठी उपकरणे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी या कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे माजी आमदार पंडित पाटील यांनी म्हटले आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी श्रीमती बैनाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कंपन्यांना तशा सूचना देण्यात येतील, असे सांगून आश्‍वस्त केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा