आलेल्या संकटाशी लढण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य व सहभाग लाभले तर या संकटाला आपण धैर्याने सामोरे जाऊन यावर निश्चित मात करू - आदिती तटकरे

आलेल्या संकटाशी लढण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य व सहभाग लाभले तर या संकटाला आपण धैर्याने सामोरे जाऊन यावर निश्चित मात करू :-  उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे 

विजय गिरी : श्रीवर्धन
करोना व्हायरसच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यातील औषधे उत्पादन करणारे तसेच सलग उत्पादन प्रक्रिया करणारे कारखाने सोडून इतर सर्व उत्पादने करणारे कारखाने तातडीने बंद करण्यात आले आहेत. 

यामध्ये महाड तालुक्यातील एमआयडीसी मधील एकुण १३० कारखान्यांपैकी १०७ कारखाने बंद करण्यात आले आहेत तर उर्वरीत सलग उत्पादने व औषधे उत्पादन करणारे २३ कारखाने सुरू ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे रोहा तालुक्यातील एमआयडीसीमध्ये एकुण ३६ कंपन्यांपैकी १३ बंद करण्यात आले असून उर्वरीत २१ सलग उत्पादन व औषधे उत्पादन करणारे कारखाने सुरू आहेत. माणगाव तालुक्यातील एमआयडीसीत एकुण ९ कारखाने असून सर्व बंद आहेत. सुरू ठेवण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी कामगारांना प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली असून इतर कामगारांनी घरी बसून 'वर्क फ्राॅम होम' नियमानुसार काम करावे. कामावर येणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी कंपनी प्रशासनास दिली असून कामगारांचे नियमीतपणे थर्मल स्क्रिनिंग करावे तसेच त्यांच्यात सोशल डिस्टंन्सिंग पाळावी अशा सुचनादेखील दिल्या आहेत. त्यांना हॅन्डवाॅश, सॅनिटायझर, मास्क अशा साधनसामुग्री उपलब्ध करून द्याव्यात. कामगारांच्या हजेरीसाठी वापरण्यात येणारी बायोमॅट्रीक अटेंन्डंन्सची सुविधा पुर्णपणे बंद केली असून प्रवास करतांना एका बसमध्ये २० प्रवासी प्रवास करतील असे सांगण्यात आले आहे. 

या संकटाशी लढण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य व सहभाग लाभले तर या संकटाला आपण धैर्याने सामोरे जाऊन यावर निश्चित मात करू असा विश्वास उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा