◆ नागरिकांकडून संचार बंदीचे उल्लंघन
◆ सोशिअल डिस्टन्सचा अभाव
◆ कोरोना से डरोना, बाजारात गर्दीच गर्दी
◆ रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली
◆ प्रशासनाची भीतीच राहिली नाही
● अनावश्यक खाजगी वाहतूक जोमातच
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
जगात आणि देशात थैमान घातलेल्या कोरोनाचे विषाणूंचा फैलाव वाढू नये व या विषाणूंना आहे त्याच ठिकाणी रोखता यावे यासाठी केंद्र व राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण देशात 14 एप्रिल पर्यत लॉकड डाऊन घोषित केलेले असून संचारबंदी केली आहे. जिल्ह्यात कलम 144 व इतर कलम देखील लागू आहेत. तरीही या सर्व शासकीय नियमांची कोणतीच भीती न बाळगता नागरिक विनाकारण रस्त्यावर, बाजारात बिनधास्तपणे फिरून संचारबंदीचे उल्लंघन करीत असल्याचे दिसत आहेत.
स्थानिक प्रशासनाकडून कोरोनाचे विषाणू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे मात्र अति उत्साही नागरिकांकडून प्रशासनाला पाहिजे तसे सहकार्य होताना दिसत नाही. शहरात दिघी नाका, मराठी शाळा नं.1, पाभरे फाटा, भाजी गल्ली, मिरची गल्ली अशा मुख्य बाजारात भाजी, किराणा माल व इतर वस्तू खरेदी करण्याचा नावाखाली लोकांची बाजारात झुंबड होताना पहायला मिळते. तर किराणा मालाच्या दुकानात तर सोशिअल डिस्टन्स न पाळता ग्राहक दाटी वाटीने जणू काही कोणताच साथ रोग सध्या आलेलाच नाही अशा अविर्भावात गर्दी करून उभे राहत आहेत. तर काही दुकानदार, व्यापारी हे देखील ग्राहकांची गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना करीत नसल्याचे पहायला मिळते. त्यामुळे देशात कोरोना महामारीला रोखण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनची म्हसळ्यात "ऐशी की तैशी" झालेली दिसत आहे.
बाजारात अगदी सकाळपासूनच लोकांची गर्दी जमायला सुरुवात होते. एसटी सेवा बंद असल्याने नागरिक टू व्हीलर, रिक्षा किंवा मिळेल ते खाजगी वाहन घेऊन बाजारात येत आहेत.
जणू काही 'कोरोना से डरोना' असे म्हणत काही नागरिक तोंडाला, नाकाला काहीच न बांधता फिरत असतात तर क्वचितच लोक मास्क, किंवा हात रुमाल बांधून येतात. परंतु कोरोनाचे विषाणू रोखण्यासाठी नागरिकांनी ज्या प्रमाणात खबरदारी व दक्षता घेतली पाहिजे ती जागरूकता कुठेही दिसत नाही.
● शासकीय अधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद नाही :-
एकीकडे तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपंचायत यांच्या माध्यमातून व तालुक्यातील काही सामाजिक संस्था, दानशूर समाजसेवक यांच्या सहकार्याने लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना खेडोपाड्यात, गावागावात जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व इतर साहित्य घरपोच डिलिव्हरी करण्याचे काम सुरू आहे. तरीही काही लोक विनाकारण वेगवेगळ्या कारणाने तालुक्याच्या ठिकाणी येऊन गर्दी करीत आहेत. नागरिकांनी कोणत्याही वस्तू खरेदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी येऊ नये असे वारंवार आवाहन शासकीय अधिकारी वर्गाकडून करण्यात येत असले तरी काही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
● रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली..?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी यांनीही दि.28 मार्च रोजी पासून आदेश काढले आहेत. परंतु खाजगी वाहन चालक व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची म्हसळ्यात मात्र पायमल्ली होत असल्याची वस्तुस्थिती आहे. रस्त्यावर खाजगी टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर गाड्या फिरविण्यास बंदी असताना देखील म्हसळ्यात शहरात बाजारपेठेत व ग्रामीण भागात सर्रास पणे खाजगी वाहने फिरत आहेत. या वाहन चालकांना जणू काही पोलीस प्रशासनाचे धाकच राहिलेले नाही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक तर रोजच बाजारात काही ना काही खरेदी करायच्या निमित्ताने खाजगी गाड्या घेऊन फिरत आहेत. अनावश्यक खाजगी वाहतूक जोमात सुरूच असून खाजगी वाहन चालक पोलिसांना खोटे कारण सांगून पोलिसांचीच दिशाभूल करताना पहायला मिळतात. त्यामुळे पुढील काही दिवस पोलिसांनी खाजगी वाहन चालकांवर व त्यांच्या वाहनांवर कडक कारवाई करून निर्बंध घातले पाहिजेत अशी मागणी होत आहे.
Post a Comment