प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
सेरेब्रल पाल्सी या असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्या १६ वर्षीय कुमार ऋषिकेश शितल सुदाम माळी या ए.आय.जे. म्हसळा, (रायगड) या काँलेज मध्ये ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने नुकताच रायगड किल्ला चढून जाऊन एक नवा अध्याय लिहत, सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरणादायी काम करत, ...'पंगू लंघयते गिरिम ' ही प्रार्थना खरी ठरवली.
एक अवघड आणि अशक्य वाटणारे दुर्गारोहण त्याने आपल्या जिद्द, चिकाटी व दुर्दम्य महत्वाकांक्षेतून, अथक प्रयत्नांची जोड देऊन, पूर्ण करत ....प्रतिकूल परिस्थितीत देखील उच्च ध्येय गाठता येते हे ऋषिकेश ने सिद्ध करून दाखवले.
मागील वर्षी इयत्ता १० वी मधील 'माऊंट एव्हरेस्ट' सर करणाऱ्या पहिल्या महिला दिव्यांग 'अरूणिमा सिन्हा' यांचा आदर्श घेऊन अथांग पसरलेल्या, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, अभेद्य गिरीशिखरावरील 'दुर्ग दुर्गेश्वर रायगड' चढून जायची उर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली व तो सर करताना कुठेही न थांबता, न थकता,न हारता हे उच्च ध्येय गाठताना , मनाने अजिंक्य राहून 'शिवनाम''गर्जत, गडावर भगवा फडकावत.... गगनभरारी घेणे आपल्या रक्तातच आहे हे दाखवून तर दिलेच आणि लगेचच हिंदवी स्वराज्यातील सर्व गडकोट पादाक्रांत करण्याचा विश्वास व्यक्त केला.
पाचाड येथे जाऊन राजमाता जिजाऊ यांच्या परम पुण्य समाधी स्थळास नमन करून व आशिर्वाद घेऊन ऋषिकेश ने या गिरिभ्रमणास प्रारंभ केला. समुद्रसपाटीपासून २८५१ फूट उंच असलेल्या या गडावर जाण्यासाठी सूर्य देवते ची वाट न पहाता 'खूबलढा'बुरुजापासून प्रेरणा घेत, गडावरील कडे कपार्यांना वंदन करत , छत्रपती शिवाजी महाराज कि जय , जय भवानी-जय शिवाजी या स्फूर्ति दायी घोषणा देत, ऋषिकेश ने आगेकूच केली . शिरकाई देवीचे दर्शन घेत ,अवघ्या अडीच तासात सुर्याबरोबरच त्याला सुर्यासम तेज असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे साक्षात दर्शन घडले. महादरवाजा, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, मेणादरवाजा, राजभवन, राणीमहल, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ येथील हिंदवी स्वराज्याच्या राजधानी चा सुवर्णाक्षरांनी लिहलेला शिवइतिहास तहान भूक विसरून,पदभमण करत, जाणून घेतला.पुढे 'हर हर महादेव ची गर्जना करत ऋषिकेश जगदिश्वर मंदिरात व प्रत्यक्ष शिवअवतार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर भावूक होऊन नतमस्तक झाला.
गड सर करताना शिवभक्त ऋतुजा घरफाळकर अमरावती, शिवप्रसाद वाघमारे, तुळजापूर. ऊस्मानाबाद, संजय लव्हाळे माजलगाव बीड,पत्रकार मित्र कैलास कदम , ऋषिकेश सुर्यवंशी वाशी मुंबई, प्राध्यापक वर्ग दयानंद काँलेज पुणे यांनी , तसेच जय मल्हार हिरकणवाडी रायगड,व लामजे बंधू पाचाड रायगड यांनी व गडावर चढणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमी नी ऋषिकेश च्या जीद्द व धाडसाला सलाम करत त्याला प्रेरणा दिली व भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
राधानगरी ,कोल्हापूर येथील सौ कुंभार मँडम यांनी त्यांच्या शालेय विद्यार्थ्यांसमोर गडावरच राजसभेत ऋषिकेश चे शिवप्रतिमा देऊन आनंदाश्रू ने 'विशेष' कौतुक केले.
दिव्यांग कुमार ऋषिकेश वर रायगड मोहीम 'सर 'केल्याबद्दल शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जन्मानंतर चार वर्षापर्यंत ऋषिकेश ९० टक्के दिव्यांग होता. दिव्यांग मुलांना केवळ घरात न ठेवता त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कला, छंद व आवड जोपासण्यास मदत करा , जग दाखवण्याचा प्रयत्न करून त्यांचे मन सक्षम बनवा
- ऋषिकेश च्या आई सौ शितल सुदाम माळी.
Post a Comment