श्रीवर्धन : विजय गिरी
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ नये या हेतूने प्रशासनाने आता एक विशेष निर्णय जाहीर केला आहे. श्रीवर्धन बाजारपेठेत भाजी, मच्छी, चिकन, मटण इत्यादी दुकाने जवळ जवळच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी आल्यानंतर या ठिकाणी गर्दी होते. त्यामुळे प्रशासनाने आज श्रीवर्धन नगर परिषद शाळा क्रमांक 1 व अंजुमन हायस्कूल या दोन शाळांच्या प्रांगणामध्ये विकेंद्रित स्वरूपाची भाजी विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण मागील दोन दिवसांपासून श्रीवर्धन शहरात कांदा-बटाटा व भाज्यांची टंचाई जाणवत होती. त्यामुळे बाजारपेठेत होणारी गर्दी खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. नागरिकांनी सदर ठिकाणी भाजी खरेदी करताना देखील सोशल डिस्टन्स चे नियम पाळून तसेच पार्किंग चे नियम पाळून भाजी खरेदी करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे श्रीवर्धन तालुक्यातील व शहरातील नागरिकांना भाजी व्यवस्थितपणे उपलब्ध होणार आहे. श्रीवर्धनला भाजी स्थानिक पीकत नसल्याने सातारा व पुणे जिल्ह्यातून भाजी खरेदी करून आणावी लागते. यासाठी भाजी खरेदीदारांना प्रशासनाकडून विशेष पास देण्यात आलेले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
Post a Comment