म्हसळा शाळा नं.१ ची जिल्हा परिषदेची जागा नगरपंचायती कडे होणार हस्तांतर. नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत होणार शाळेच्या जागी.
माजी विद्यार्थ्यांच्यात तिव्र नाराजी.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहर नगर पंचायत हद्दीतील म्हसळा शाळा नं.१ च्या जागेत नगरपंचायतीची भव्य प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्तावाला अखेर जिल्हा परिषदेने मंजुरी दिली असल्याने आता शाळेच्या जागी नगरपंचायतीची भव्य दिव्य इमारत होणार आहे. सुमारे सुमारे १४५ वर्षापूर्वीच्या या शाळेचे ९ गुंढे क्षेत्र असणाऱ्या या जागेत सद्यस्थितीत म्हसळा शाळा नं १ चा इयत्ता ४ थीचा वर्ग व कार्यालय व केंद्रीय शाळा अशा इमारती आहेत. म्हसळा शहराचे नगरपंचायतीचे प्रशासकीय कामकाजासाठी व नगरसेवकांसाठी सध्यास्थितीत असणारे नगरपंचायत कार्यालय अपुरे पडत असल्याने या जागेची मागणी नगरपंचायतीकडून २०१५ पासून .करण्यात येत होती. नुकतेच रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक १२( १६ ) मध्ये ९ गुंठ्यात असणारी राजीप शाळा न.१ गावठाण क्रं.१/१८७ ही जागा ग्रामविकास विभागाचे नियमांचे अधिन राहून नगरपंचायतीकडे वर्ग करण्यास हरकत नसल्याचा रायगड जिल्हा परिषदेने ठराव ग्रामविकास व नगरविकास विभागाकडे .पाठविला आहे. त्यामुळे जागा हस्तांतरणाचा नगरपंचायतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे उघड आहे.
ही इमारत पुरातन वास्तू आसल्याचा दावा शहरातील गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन करडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबू शिर्के, सुशिल यादव, अरुण उर्फ बाळा जंगम, वैभव कळस, सुरेश कुडेकर, समीर करडे आदी माजी विद्यार्थानी केला आहे योग्य पाठपुरावा न झाल्यामुळे माजी विद्यार्थ्यांची मागणी शासनाकडे कदाचीत पोहचली नसावी, परंतु नव्याने पुरातन इमारत ह्या मुद्यावर माजी विद्यार्थी ठाम असून मागणी लावून धरणार असल्याचे समजते.
"१४५ वर्षापूर्वीची नवाब कालीन मराठी शाळा काही राजकीय लोकप्रतिंनिधी आपल्या फायद्यासाठी हद्दपार करत आहेत आवश्यकता वाटल्यास रस्त्यावर उतरू "
-सुनील अंजार्लेकर,अध्यक्ष कुंभार समाज तथा उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन कमिटी .
"राजीप शाळा न.१ गावठाण क्रं.१/१८७ ही जागा नगरपंचायतीने ताब्यात घेतली तरी त्यामध्ये आवश्यकते प्रमाणे वर्गखोली कार्यालय व केंद्र प्रमुख कार्यालय यासाठी नगरपंचायत बांधकाम करणार आहे. यासाठी नगरपंचायत नगरविकास व ग्रामविकास विभागाच्या अटी व नियमाचे पालन करणार आहे"
श्रीमती जयश्री कापरे , नगराध्यक्ष नगरपंचायत, म्हसळा
Post a Comment