मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)
आदरणीय गजलकार सुरेश भट यांनी मराठी मातीत आणि मराठी मनामनांत रूजवलेला काव्यप्रकार म्हणजे गजल. आजही गजल ऐकणारा वर्ग महाराष्ट्रभरात पसरला आहे. पण चांगले नवे गजलकार तयार होत नाहीत. ही उणिव पोेएम कट्टाच्या मितेश वळंजू, रोहित भोसले यांना सातत्याने छळत होती आणि त्यांनी ही पोकळी दूर करण्याचा ध्यास घेतला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि जवळपासच्या परिसरातल्या २५ इच्छुक कवींना त्यांनी एकत्र आणले आणि १६ फेब्रुवारी २०२० रोजी शिरोडकर विद्यालय, परेल येथे एक दिवसीय गजल कार्यशाळेचे आयोजन केले. मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे ख्यातनाम गजलकार अे. के. शेख यांना आमंत्रित करण्यात आले होते.
"बारा स्वर आणि छत्तीस व्यंजन मराठी भाषेने दिलेले वेदमंत्र आहेत आणि त्यांपासून तयार झालेले शब्द म्हणजे अमृताहून गोड भाषेची समृद्ध फळं आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी मराठी भाषेतच कलाकृती निर्माण करण्याचा अट्टहास केला पाहिजे." असं प्रतिपादन केले. मराठी भाषेवरची त्यांची पकड आणि मागच्या सहा दशकांत केलेली साहित्य सेवा त्यांच्या प्रत्येक शब्दांतून व्यक्त होत होती. प्रेम करण्यासाठीच हे आयुष्य कमी पडत असताना लोकं वैरभाव मनात का बाळगतात, हा प्रश्नच सर्वकाही सांगून जातो. कविता कोणताही शब्द सहज स्वीकारते पण गजल तिला पाहिजे तोच शब्द मिळवल्याशिवाय पूर्ण होत नाही, मुकंमल होत नाही. अशा साध्या सोप्या भाषेत त्यांनी गजल नवोदितांसमोर हळूहळू उलगडली.
सदर गजल कार्यशाळेत चंदन पेठकर, डॉ. सुजाता मराठे, मनीषा ताम्हणे, विक्रांत लाळे, डॉ. अनिल सांगळे, विनोद निकम, संतोष मोहिते, स्वप्नील खैरे, अमोल रोकडे, स्नेहल गोसावी, विजय कदम, सुवर्णा जाधव, शारदा खांदारे, यशवंत दिडवाघ, वर्षा भिसे, डॉ. दीपा राजवर्धन, मंगला उदामले, मंजू सराठे, विश्वास भोसले, नैनेश तांबे, शैलेश भूतनर, संदीप ऐटम आणि सिद्धार्थ जाधव यांनी सहभाग घेऊन गजलचे प्राथमिक ज्ञान शेख सरांकडून प्राप्त केले.
कार्यशाळा संपन्न होत असताना सर्व सहभागींना गजलकार अे. के. शेख यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ह्या कार्यशाळेसाठी खास परिश्रम घेतल्याबद्दल गुरुदत्त वाकदेकर यांचा गजलकार अे. के. शेख यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मितेश वळंजू आणि रोहित भोसले यांनी अथक मेहनत घेतली.
Post a Comment