प्रतिनिधि म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यातील वारळ हे गाव प्रसिद्धी झोतात येण्याचे मुख्य कारण म्हणजे १९७२ साली तेथील नदी पात्रात निर्माण झालेलं श्री गुरुदत्तांचे स्वयंभु स्थान. प्रतिवर्षी याठिकाणी दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्ती भावात आणि उत्साहात साजरा केला जातो.
चोहोबाजूंनी डोंगर आणि मध्येच असलेल्या भव्य नदीपात्रात निर्माण झालेल्या या स्वयंभु स्थानी मंदिर निर्माणाचा संकल्प स्वयंभु गुरुदत्त मंडळ या सेवाभावी संघटनेने केला आहे.त्याचा पायाभरणी सोहळा मा.आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभहस्ते दत्त जयंती च्या शुभ दिनी दि.११ डिसें.रोजी दुपारी २ वा. च्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला. प्रसंगी त्यांच्या समवेत म्हसळा तालुका सभापती सौ.छायाताई म्हात्रे,नवी मुंबई शिवसेना शहरप्रमुख श्री.नरेशभाई चाळके,समीर बनकर,सरपंच श्री.रमेश खोत आदि मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यावर्षी मंडळाने म्हसळा - श्रीवर्धन तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची आगळी वेगळी पारंपारिक दिंडी स्पर्धा आयोजित केली होती.
या अभिनव स्पर्धेत कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेने प्रथम, जिजामाता हायस्कूल,वरवठणे यांनी द्वितीय तर रा.जि. प.मराठी शाळा, रोहिणी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रा.जि. प.मराठी शाळा तुरुंबाडी आणि खरसई यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच रात्री कोकण एज्युकेशन सोसायटी प्र. ना.पाटील माध्यमिक शाळा,काळसुरीच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी ' वारी दत्तगुरुंची - रात्र चैतन्याची ' हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.व्यावसायिक रंगभूमीलाही लाजवेल अशी गुणवत्ता लाभलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करुन संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जपली.
दि.१२ डिसें. रोजी म्हसळा तालुक्यातील तरुणांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून म्हसळा कबड्डी असोसिएशनच्या कबड्डी स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.या स्पर्धेच्या निमित्ताने श्री.खेडकर साहेब,वरीष्ठ पोलिस निरीक्षक म्हसळा तालुका यांनी आवर्जून उपस्थिती लावून तरुणांच्या या जिगरबाज स्पर्धेत शुभेच्छा देऊन तरुणांचा उत्साह द्विगुणित केला.अगदी सुरुवाती पासून रोमांचकारी झालेल्या या स्पर्धेत श्री काळभैरव क्रिडा मंडळ,काळसुरी या संघाने बाजी मारत अंतिम विजेतेपद पटकावले.
दत्त जयंती उत्सवा बरोबर या निसर्गरम्य परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा विकास कसा करता येईल या दृष्टीने कोकण पर्यटन विकास महामंडळाकडे पाठपुरावा करणार -श्री.रुपेश नारायण पाटील, अध्यक्ष स्वयंभु गुरुदत्त मंडळ



Post a Comment