प्रत्येक वेळी नशीब मदत करेल अशा गैरसमजात न राहता महिलांनी आर्थिक सक्षमीकरणा साठी संधी शोधणे आवश्यक -प्रकाश कोठावळे
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
आपल्या देशातील महिलांना उद्योग व्यवसायाचे अनेक माध्यम आहेत व तसे प्रयत्न होताना देखील दिसत आहेत. मात्र प्रत्येक वेळी नशीब मदत करेल अशा गैरसमजात न राहता महिलांनी आर्थिक सक्षमीकरणासाठी संधी शोधणे आवश्यक मत संकल्प सेवाभावी संस्था म्हसळा चे संस्थापक सचिव श्री . प्रकाश कोठावळे यांनी नाबार्ड व दि रायगड जिल्हा मध्य सहकारी बँक लि अलिबाग शाखा म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सक्ष्मीकरण मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले. यावेळी शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री डी. बी. सरदार बँकेचे अधिकारी श्री. एम. एस. मुंडे शाखा निरीक्षक श्री. एस. जी. शिर्के.श्री व्ही. बी. पयेर मजगाव शाखाधिकारी सौ पी. एस. शिंदे ,माजी नगराध्यक्षा सौ. कविता बोरकर व शाखेतील कर्मचारी वर्ग आणि विविध बचत गटातील महिला उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री कोठावळे म्हणाले की,नाबार्ड ने महिलांचे सशक्तीकरणासाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. गावागावातील बचत गट हे महिलांना आर्थिक दृष्टया सशक्त बनविण्यासाठी उत्तम संधी आहेत. रोजगार आणि आत्मसन्मान या दोन्ही चांगल्या गोष्टी बचत गटाच्या माध्यमातून एखादी स्त्री कमावू शकते व यातून संघभावनाही जोपासली जाऊ शकते. त्यामुळे केवळ कागदावरील शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी गटाची स्थापना नसून यातून प्रत्येक महिला सभासदाला रोजगार निर्मिती होणेसाठी लघुद्योग करणे आवश्यक आहे. भारतात 1992 च्या दरम्यान बचत गटाच्या चळवळीला खरा वेग आला, व त्यातून महिलांमध्ये संघटन शक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण झाली आणि म्हणूनच चूल व मूल इतकेच विश्व् असणाऱ्या महिला आज बचत गटाच्या माध्यमातून बाह्य जगाच्या संपर्कात आल्या आहेत. महिलांमध्ये असणारे संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन, अर्थकारणाची सांगड, जबाबदारीची जाणीव, जोखीम स्वीकारण्याची वृत्ती, परिस्थिती हाताळण्याची कला, नेतृत्व गुण, कामातील नीटनेटकेपणा, चोख व्यवहार, या उत्तम उद्योजकीय गुणांचा वापर करून बचत गटातील महिला उद्योग क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात असे सांगितले. सुरुवातीला बँकेचे अधिकारी श्री.एम.एस. मुंडे साहेब यांनी सर्वांचे स्वागत करून मेळाव्याच्या उद्देशाची व बँकेच्या विविध योजना व महिला सक्षमीकरण्याकरिता बँक देत असलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली,तसेच बँकेमार्फत चालू असलेल्या विविध विमा योजनांची महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच आरोग्य विभागाच्या आशा गटसमन्वक सौ पाटील मॅडम यांनी आरोग्यविषयक आवश्यक अशी उपयुक्त माहिती देताना बँक देत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. उपस्थित महिलांना शाखेकडून पॉकेट कॅलेंडरचे वाटप करणेत आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मुंडे यांनी केले तर श्री शिर्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post a Comment