श्रीवर्धन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन



● आदिती तटकरे, ज्ञानदेव पवार व विनोद घोसाळकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल 

● श्रीवर्धन परिसरात वाहतुक कोंडी 

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

  राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्व पक्षीय कार्यकर्ते जोरात कामाला लागल्याचे चित्र आहे श्रीवर्धन मध्ये सर्वत्र निदर्शनांस येत आहे. दि.03 ऑक्टोबर रोजी श्रीवर्धन प्रांताधिकारी शेडगे यांच्याकडे शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे व आय काँग्रेस चे बंडखोर ज्ञानदेव पवार यांनी आपले अर्ज सादर केले आहेत .
 शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार विनोद  घोसाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी अर्ज दाखल करतांना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, वरिष्ठ नेते व आजी माजी आमदारांनी श्रीवर्धन प्रांत कार्यालय गजबजून गेले होते. शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांच्या अर्जाच्या वेळी माजी आमदार तथा नुकतेच शिवसेनेत प्रवेश करते झालेले अवधूत तटकरे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, आमदार पदासाठी चर्चेत नाव असलेले अनिल नवगणे व भाजप कडून पाच वर्षे आमदारकीची स्वप्न रंगवणारे कृष्णा कोबनाक सर्व सोबत होते. गेल्या विधान सभेला अवघ्या 72  मताने पराभूत झालेले रवी मुंडे तसेच म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव तालुक्यातील सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते. नगरपालिका मैदानात स्थानिक नेत्यांनी भाषणे करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांनी बहिणीच्या प्रचारासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन  केले. रोहा, माणगाव, म्हसळा,तळा व श्रीवर्धन तालुक्यातील विविध भागातून पक्ष कार्यकर्ते असंख्य वाहने घेऊन श्रीवर्धन मध्ये हजर झाले होते. त्यामुळे श्रीवर्धन शहराच्या जसवली ते सोमजाई व मच्छिमार्केट पर्यंत सर्वत्र वाहनांनी गर्दी केली होती. पोलीस प्रशासना कडून वाहतूककोंडी साठी योग्य प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा अभाव निदर्शनांस आला. सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र आल्या नंतर  तालुक्यात कुठे ही गैर कृत्य, वादावादीची घटना घडली नाही. 
  या पूर्वी सुनील तटकरे यांनी 2009 मध्ये आमदार म्हणून श्रीवर्धन मतदार संघात काम केले आहे. 2014 ला अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता. श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या दहा वर्षात विविध कामाद्वारे आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र 2014 पासून महाराष्ट्रातील सत्ताकारणात बदल झाल्या पासून शिवसेनेने पुर्ववत मतदार संघात आपले प्रस्थ निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. शिवसेना पक्ष सोडून इतरत्र गेलेल्या कार्यकर्त्यांना स्वगृही बोलवण्यात पक्ष नेतृत्वाला यश मिळाले आहे. लोकसभेच्या वेळी माजी खासदार अनंत गीते यांच्यावर मतदार संघातील जनता नाराज असल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र विधान सभेच्या वेळी पक्ष श्रेष्ठीनी विनोद घोसाळकर यांच्या सारखा आश्वासक चेहरा दिला आहे त्यामुळे सर्वत्र शिवसैनिक कामाला लागले आहेत. एकीकडे काहीप्रमाणात खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात नाराज असलेले विविध गट एकत्र आल्याचे दिसून येत आहे. तटकरे यांनी मतदार संघातील सर्व भागात जनतेशी सलोखा व आत्मीयतेचे संबंध निर्माण करण्यात यश मिळवले आहे. श्रीवर्धनचा विकास हा सुनील तटकरे यांचा मुद्दा सर्वसामान्य जनतेच्या पसंतीला उतरला आहे. त्यामुळे या वर्षीची विधान सभा रंगतदार होण्याची चिन्ह आहेत.

आदिती तटकरे, ज्ञानदेव पवार व विनोद घोसाळकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा