म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर ठाकरोली येथे वर्षभर शिक्षणाबरोबरच विविध विधायक आणि विद्यार्थ्याना भविष्यात उपयुक्त उपक्रम राबवून त्यांच्या बुद्धीला चालना देण्याचा आणि शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसह सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही ठाकरोली शाळेतील विद्यार्थी नेहमीच अग्रेसर असतात. शाळेचे मुख्याध्यापक शरद शिवाजी कोद्रे, शिक्षक माउली गिरीगोसावी, महेश निरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या उपक्रमात सहभागी होतात. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक खेरटकर, ग्रामस्थ स्वेता जाधव, सिमरन कापडी, अनिषा मोरे, कविता जाधव, लक्ष्मी खोपरे, मोहन कापडी, भिवा खोपरे, महिला मंडळ यांचे नेहमीच सहकार्य लाभते त्यामुळेच आम्ही सर्व उपक्रमात यशस्वी होत असल्याचे मुख्याध्यापक शरद कोद्रे यांनी सांगितले.
मागील काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असताना यावर्षी शेतात प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्याना भात शेती, नाचणी, वरी पिकाबद्ल सविस्तर माहिती देऊन शिक्षणाबरोबरच शेती, बागायती, भाज्या, व्यवहारी ज्ञान या बद्दल प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगून या वर्षी दोडका, भोपळा, कारली, घोसाळी, भेंड, वांगी, मिरच्या इत्यादी भाज्यांचे चांगल्या प्रकारे पीक घेऊन त्या भाज्यांचा रोजच्या मध्यांन भोजनात वापर करून सकस आहार देण्याचा प्रयत्न मी व माझे सहकारी यांनी केल्याचे शरद कोद्रे यांनी सांगितले.
तसेच या स्तुत्य उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, पाष्टी केंद्राचे केंद्र प्रमुख बी.आर.आडे यांचेही मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगितले.

Post a Comment