श्रीवर्धन तालुक्यात नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी



श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन तालुक्यामध्ये नारळी पौर्णिमेच्या १५ दिवस अगोदर मच्छीमार बांधव सागराचे पाणी आपल्या घरामधे आणतात . या आणलेले समुद्राचे पाणी एका तांब्याच्या कळशीमध्ये ठेवून ती कळशी आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवून मनोभावे पूजा करतात . नारळीपौर्णिमा हा कोळी समाजाचा जीवनातील अविभाज्य सण आहे . श्रीवर्धन तालुक्यातील जीवना कोळीवाड्यामध्ये जीवना बंदर येथील पुरूष व महिला , लहानमुले यानी पारंपारिक कोळी वेशभूषा घालून सागराचे पूजन केले . फटाक्यांचा आतीषबाजीत नाचत कोळीनृत्य करित संपूर्ण वरचा जीवना कोळी वाडा व खालचा जीवना कोळी वाडा या दोन्ही कोळीवाड्यांमधून महिलांनी डोक्यावर सागराचे पाण्यानी भरलेला कळस घेऊन मिरवणूक काढण्यात आली . या मिरवणुकीमध्ये सर्वांनी हजेरी लावली होती . शेवटी ही मिरवणूक समुद्र किनारी आल्यावर महिला , पुरुष , लहान थोर मंडळींनी सागराला विनंती करून त्याची यथोचित पुजाआर्चा करून सागराला मानाचा नारळ अर्पण केला . दरम्यान नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला मानाचे श्रीफळ अर्पण करून मग आपआपल्या नौका समुद्रात मासेमारीसाठी रवाना करण्यात येत असतात . श्रीवर्धन तालुक्यातील दिघी , कुडगाव , आदगाव , दिवेआगर , भरटखोल , शेखाडी , जीवनाकोळी वाडा , मुळगाव कोळीवाडा , बागमांडला आदी समुद्र किनारी असलेल्या गावातील मच्छिमारांनी आनंद मिळवत नाचत वाजतगाजत फटाक्यांचा आतिशबाजी व गुलालाची उधळन करीत नारळी पौर्णिमाचा सण मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा केला . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा