श्रीवर्धनमध्ये पावसाचे तीव्र पडसात : गणेश आळीतील लोकांच्या जीवितास दरडीचा धोका ; नगरपालिकेची प्रतिबंधात्मक उपाययोजना
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्यावर्षी पावसाचे जोरदार पडसात सर्वत्र उमटत आहेत श्रीवर्धन शहरातील गणेश आळीच्या उत्तर विभागास दरडीचा धोका निर्माण झाला आहे तसेच श्रीवर्धन शहरातील 11 जीर्ण मनुष्यहीन इमारतीच्या मालकास नगरपालिकेने नोटीसा बजावल्या आहेत .
1 ऑगस्ट पासून श्रीवर्धन तालुक्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली त्यामुळे 2 ऑगस्ट च्या रात्री गणेश आळीतील डोंगराळ भागावरील दरड कोसळली सदरचे वृत्त समजल्यानंतर श्रीवर्धन शहराचे नगराध्यक्ष ,तहसीलदार,मुख्याधिकारी, अभियंता यांनी समक्ष जाऊन दरड प्रवण क्षेत्राची पाहणी केली आहे. गणेश आळीत सुमारे 150 च्या जवळपास लोकांची वस्ती आहे. त्यापैकी 7 ते 8 घरांना दरडीचा धोका मोठ्या स्वरूपात निर्माण झाला आहे. भवितव्यात निर्माण होणाऱ्या आपत्तीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने संबंधित दरड प्रवण क्षेत्रातील लोकांसाठी श्रीवर्धन नगरपरिषदेची शाळा नंबर 1 व पर्यटन निवासाची वास्तू तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उपलब्ध केली आहे परंतु दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही ही चिंतेची बाब असून नगरपालिका प्रशासनाकडून जनतेला सहकार्याचे व सुरक्षेचे आव्हान करण्यात येत आहे. श्रीवर्धन शहरातील जीर्ण अवस्थेतील 11 मनुष्यहीन इमारतीस नगरपरिषदेकडून त्यांच्या मालकास नोटीसा बजावण्यात आल्या आहेत त्यामध्ये मधला कोळीवाडा, मुकादम भाट, वेताळ पाखाडी, चौकर पाखाडी, साळीवाडा, शिवाजी चौक , सिद्धार्थ नगर, ओजाळे पाखाडी, वरचा जीवना व रफी अहमद किडवई मार्ग या ठिकाणावरील इमारती धोकादायक झाल्याचे नगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनांस आले आहे त्याकारणे नगरपालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे .नैसर्गिक आपत्ती मानवी जीवनास नेहमीच धोकादायक ठरलेली आहे ह्या 5 दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे श्रीवर्धन मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे .झाडे उन्मळून पडणे , घराच्या भिंती पडणे , पत्रे उडून जाणे असे विविध प्रकार घडले आहेत .
श्रीवर्धन नगरपरिषद गणेश आळीतील जनतेच्या सोबत आहेत .नगरपालिकेने त्यांच्या सुरक्षेचे दायित्व स्वीकारले आहे दरड प्रवण क्षेत्रातील लोकांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे .... नरेंद्र भुसाने ( नगराध्यक्ष श्रीवर्धन)
गणेश आळीतील उत्तर विभागातील 7 ते 8 घरांना दरडीचा धोका आहे गेल्यावर्षीच्या पावसात सुद्धा संबंधित घरांना काही स्वरूपात क्षती पोहोचली होती त्यामुळे संबंधित लोकांना आर्थिक फटका पोहोचलेला आहे तरी ह्यावर्षीच्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गणेश आळीतील लोकांनी कुठलाही धोका स्वीकारू नये जेणेकरून त्यांना मोठ्या स्वरूपातील हानीस सामोरे जावे लागेल ........ अनंत गुरव ( नगरसेवक श्रीवर्धन नगरपरिषद )
दरड प्रवण क्षेत्रातील लोकांच्या सुरक्षतेची काळजी घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना केली आहे .नगरपरिषदेच्या शाळा नंबर एक व पर्यटन निवास तात्पुरत्या स्वरूपात निवासासाठी तयार ठेवले आहे .जनतेने दरड समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपालिकेला सहकार्य करावे .......किरणकुमार मोरे (मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद )

Post a Comment