श्रीवर्धन मध्ये संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन ; सर्वसामान्य लोकांचे कामासाठी हाल



श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
श्रीवर्धन पंचायत समितीच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने त्यांच्या  प्रलंबित मागण्यासाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले आहे .त्याचा परिणाम विविध प्रशासकीय ऑनलाईन कामावर झाल्याचे दिसून आले आहे .आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायत , पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक म्हणून हजारो संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत आहेत .हे काम करत असताना राज्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला रहिवाशी , बांधकाम परवाना , पिटीआर नक्कल यासह सर्व 29 विविध दाखले , ग्रामपंचायत चा संपूर्ण जमा खर्चाची नोंद घेणे , ग्रामसभा , मासिक सभा यांचे ऑनलाईन कामकाज , 14 व्या वित्त आयोगाचे गाव विकास आराखडे यासह शेतकरी कर्जमाफी , अस्मिता योजना , जनगणना , प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाखो कुटुंबाचा घरकुल सर्व्हे , प्रधानमंत्री पीकविमा योजना  ही सर्व कामे संगणक परिचालक  करतात .गेल्या 8 वर्षांपासून परीचालकांवर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे .तसेच  शासन वारंवार बोगस कंपन्याची नियुक्ती करत आहे .सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाचे काम भ्रष्ट कंपनी ला देण्यात आले आहे . असा  आरोप परिचालक संघटेनेने केला आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात परिचालकांनी  विविध मागण्या केल्या आहेत .महाराष्ट्र आय टी  महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी .पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परीचालकांना नियुक्ती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने दिली असून त्यास आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी .सर्व परीचालकांना किमान 15 हजार रुपये मानधन दयावे .तसेच एप्रिल  2017 ते जुलै 2019 पर्यंत चे थकीत मानधन द्यावे .नोटीस न देता कामावरून कमी केलेल्या परीचालकांना पुर्ववत कामावर घ्यावे तसेच बाकी असलेले मानधन तात्काळ देण्यात यावे अशा विविध मागण्याचा  निवेदनात समावेश करण्यात आला आहे .बुधवारी दिवस भर परीचालकांनी धरणे आंदोलन केल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण तालुक्यात दिसून आले .
सदरच्या धरणे आंदोलनाला श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या  अफझल मेमन , सिद्धेश कसबे  .गणेश पोलेकर, मंगेश कोमनाक ,यांनी पक्षाच्या वतीने पाठींबा दर्शवला आहे  .

संगणक परीचालकांचे कमी वेतनात अतिशय हाल होत आहे .शासन दरबारी अनेकदा निवेदने सादर केले आहेत तरी सुद्धा सरकार दखल घेत नाही त्या कारणे आज धरणे आंदोलन करावे लागत आहेत .
-वृत्तिका हावरे ( परिचालक संघटना तालुका अध्यक्ष )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा