वादळी वाऱ्यामुळे आदगाव शाळेचे छप्पर उडाले : सात वर्षांपासून दुरुस्तीची मागणी


दिघी : गणेश प्रभाळे 
श्रीवर्धन तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आदगाव शाळेला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे . शाळेचे पत्रे , कौले उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . दुपारच्या सुट्टीच्या वेळी ही घटना घडली . त्यामुळे विद्यार्थी बालंबाल बचावले आहेत . जिल्हा परिषदेची आदगाव ही शाळा समुद्र किनारी बांधण्यात आली आहे . सद्यस्थितीत शाळा वाळवी लागल्याने धोकादायक बनली होती . स्थानिक ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन सदस्याने याकडे लक्ष वेधत शाळा दुरूस्तीबाबत पत्रव्यहारही केला असल्याचे समजते ; परंतु याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याने  ही वेळ आल्याचा आरोप शाळा व्यवस्थापक सदस्य व स्थानिकांनी केला आहे . आदगाव जिल्हा परिषदेच्या शाळेच्या एकूण पाच वर्गखोल्या असून , अचानक सुटलेल्या वादळी वा-यामुळे एका खोलीचे पत्रे उडाले . तर दुस-या खोलीचे कौलारू छप्पर उडाले . त्यापैकी एक खोली साधारण बऱ्यापैकी आहे . उर्वरित दोन्ही खोल्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे . शाळेत एकूण ६८ विद्यार्थी असून , तीन शिक्षक आहेत . शुक्रवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास जेवणाच्या सुट्टीदरम्यान , अचानक झालेल्या सोसाट्याच्या वा-याने शाळेचे पत्रे , कौले उडाली आणि सुमारे ९ ते १० लाखांचे नुकसान झाले . जेवणाची सुट्टी असल्याने मुले बालंबाल बचावली . मात्र मोठी वित्तहानी झाली आहे. 
काही ठिकाणच्या भितीचेही नुकसान झाले असून , विद्यार्थ्यांपैकी अर्ध्या मुलांची पर्यायी व्यवस्था त्याच गावातील का मंदिरामध्ये केली आहे . तर अर्ध्या मुलांची व्यवस्था गावातील एका व्यासपीठावर तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे . प्रशासनाने तातडीची मदत म्हणून आदगाव ग्रामपंचायत व शिक्षण विभाग श्रीवर्धन यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार असे एकूण दहा हजार रुपये दिले आहेत . मात्र ते अपुरे आहेत . लाकडी छप्पर हे वाळवी लागून खराब झाल्यामुळे तसेच पावसाचे पाणी सतत भिंतीवर पडत असल्याने आता कोणत्याही वेळी ही इमारत कोसळण्याची दाट शक्यता आहे . त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे . तसेच डिजिटल वर्गाची प्लास्टिक शेड फाटल्याने शैक्षणिक साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे . वरातीमागून घोडे नाचवत आता श्रीवर्धन प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत . जिल्ह्यातील सर्वशिक्षण अभियानचे मोकल , श्रीवर्धन गटविकास अधिकारी वाय . एन . प्रभे , सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे , गटशिक्षण अधिकारी राऊत , केंद्रप्रमुख पिगडे , उपसरंपच सुदेश मोरे , कोळी समाज अध्यक्ष यांच्यासमोर अभियांता मोकल यांनी अंदाजे ९ लाख रूपये अंदाजपत्रक तयार केले असून आदगाव जिल्हा परिषदेच्या शाळेची लवकरात लवकर दुरूस्ती करण्याचे काम करण्यात येईल , असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले . 

आदगाव जिल्हा परिषद शाळेचे वादळी वा-याने मोठे नुकसान झाले आहे . याची आम्ही पाहणी केली असून साधारणपणे ९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे . ते तातडीने रायगड जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येत आहे . लवकरात लवकर दुरूस्तीचे काम करण्यात येईल . विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही , याची दक्षता घेत आहोत.
-बाळासाहेब भोगे, सहाय्यक गटविकास अधिकारी, श्रीवर्धन 

याबाबत वांरवार प्रशासनाकडे पत्रव्यहार केलेला होता . परंतु प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही . देव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली आहे . अन्यथा मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले असते . आता तरी याकडे अधिक लक्ष देऊन शाळा तातडीने दुरुस्त करावी व शाळेतील विद्याथ्यांचे नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यावी.
-लौकिता मोरे , सरपंच , आदगाव ग्रामपंचायत 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा