प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
पाच दिवस धुवांधार बॅटींग केल्यानंतर पावसाने उसंत घेतली आहे . पाऊस थांबल्यामुळे आता शेतीच्या कामांना वेग आला आहे . लावणीच्या कामांनाही सुरूवात झाली आहे . जिल्हयातील बहुतांश धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे . जून महिन्याच्या सुरूवातीला मान्सून पूर्व सरी कोसळल्या त्यानंतर मात्र पावसाने तोंड दाखवले नाही . त्यामुळे शेतकरी वर्गात निरूत्साह पहायला मिळत होता . जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मात्र पावसाने दमदार हजेरी लावली . सलग ५ दिवस झालेल्या पावसाने आपली सुरूवातीची कसर भरून काढली . जिल्ह्याच्या एकूण सरासरीच्या २५ टक्के पाऊस झाला आहे . मात्र आता पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसामुळे सर्वत्र पाणीपाणी झाले आहे . शेतांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकरी वर्ग कमालीचा सुखावला आहे . शेतीच्या नांगरणीच्या कामाला वेग आला आहे . रोपे उगवून चांगली वर आल्याने काही शेतक - यांनी लावणीच्या कामालादेखील सुरूवात केली आहे . शेतकरी लावणीच्या कामांमध्ये गुंतल्याचे चित्र पहायला मिळाले . रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातही भाताची लावणी सुरू झाली असून लावणीसाठी योग्य वातावरण असल्याचे कृषी अधिकारी सांगतात . जिल्हयात आतापर्यंत २९ . ५७ च्या सरासरीने ९२९ . ३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे . धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्येही पाणीसाठा झाला आहे . जिल्हयात २ मध्यम तर ३९ लघुपाटबंधारे आहेत तर पाझर तलावांची संख्या ३६ आहे . त्यामध्ये ४० ते ६० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे . तर काही धरणे ओसंडून वाहू लागली आहेत .

Post a Comment