श्रीवर्धन बाजारात बोंबलांची आवक वाढली दिघीच्या बोंबलाला अच्छे दिन , मच्छीमारांना दिलासा तर खवय्यांची चांदी
दिघी : प्रतिनिधी
खोल समुद्रातील मासेमारीबंदी लागू झाल्यापासून महागलेले बोंबील पुन्हा सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत , किना-यावर मासेमारी करणा-यांच्या जाळ्यात ओले बोंबील अधिक प्रमाणात येऊ लागले आहेत . आवक वाढल्यामुळे किंमतीही काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. श्रीवधन , बोर्लीपंचतन तसेच दिघी व कुडगाव येथे मोठ्या प्रमाणात बोंबील दिसत आहेत . जिल्ह्यासह श्रीवर्धन तालुक्यात गुरुवार पासून पावसाने जोरदार हजेरी लावली . त्यामुळे आठवड्याभरात सर्वत्र पाणी - पाणी करून सोडले आहे . मात्र , मंगळवार पासून पावसाने विश्रांती घेतल्याने खाडीलगत बोंबील , निवटा , खेकडी आणि मांदेली सारखे मिळणारे लहान मासे मोठ्या प्रमाणात येऊ लागले . समुद्रातील प्रदूषण , त्यामुळे कमी झालेले मासळीचे प्रमाण आणि त्यातच लागू असलेली मासेमारी बंदी यामुळे एरव्ही परवडणारे बोंबील , मांदेलीसारखे मासेही काही दिवसांपूर्वी महाग झाले होते . त्यांच्या किंमती दुपटीपेक्षा अधिक वाढल्या होत्या . १२० ते १४० रुपयांना मिळणारा १० ते १२ बोंबलांचा वाटा आता ८० ते १०० रुपयांत मिळू लागला आहे . त्यामुळे खवय्यांकडून समाधान व्यक्त होत आहे . बोंबलांची आवक याही पेक्षा अधिक वाढण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे . पाऊस सुरू झाला की श्रीवर्धनच्या जीवना बंदर , आदगाव तसेच दिघी किना-यावर वळगणीची मासळी येते . त्यापाठोपाठ बोंबलांची आवक कधी वाढणार याची प्रतीक्षा मत्स्याहारी करतात . पावसाच्या सुरुवातीच्या दिवसांत जाळ्यात येणारे बोंबील आकाराने लहान असतात . परंतु जुलै व ऑगस्टच्या सुमारास त्यांचा आकार मोठा होतो . त्यामुळे खवय्यांना या मोठ्या माशांची प्रतीक्षा असून दरही कमी होतो . सध्या श्रीवर्धन मधील हॉटेल्स मध्ये देखील मांसाहारी पदार्थाच्या हॉटेलमध्ये बोंबील फ्रायला जास्त मागणी असते . खोल समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे पापलेट , सुरमईसारखे मोठे मासे बाजारात फारसे उपलब्ध नसतात .
सुरुवात असल्यामुळे दिघी खाडीलगत बोंबील कमी प्रमाणात मिळू लागले आहेत . जवळासह बोंबील , कालवटे यांसारखी पावसाळ्यात मिळणारी मासळीही सध्या मिळू लागली आहे . त्यामुळे मच्छीमारांनाही मासेमारी बंदी असताना थोडासा दिलासा मिळत आहे.
-लीला मेंदाडकर , दिघी .
सुसज्ज मार्केटची कमतरता भासते. विस्तीर्ण समुद्रकिना-यामुळे श्रीवर्धन तालुक्याची आता पर्यटन क्षेत्र म्हणून खास ओळख बनली आहे . मात्र , स्थानिक तसेच पर्यटकांना ओली किंवा सुकी मासळी मिळण्यास दिघी येथे खास ठिकाण नाही. त्यामुळे आदगाव तसेच दिघी येथील मच्छिमारांना मच्छि विकण्यास अडचण येतात. प्रशस्त मच्छिमार्केटची गरज आम्हा कोळी बांधवांना आहे.-बाळाराम हरी खेलोजी , कोळी समाज अध्यक्ष , दिघी

Post a Comment