श्रीवर्धन मतदारसंघात राजकीय पक्षांची तयारी सुरू


श्रीवर्धन : आनंद जोशी
महायुतीचे नवीन केंद्र सरकार अस्तित्वात येऊन त्यांचे कामकाजही सुरू झाले आहे . आता महाराष्ट्रात सर्वांचे लक्ष साधारणपणे ऑक्टोबर २०१९ मध्ये येणा-या महाराष्ट्र विधानसभेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकांकडे केंद्रीत झाले आहे. त्यादृष्टीने वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी युत्या , आघाड्या, जागा वाटपासंबंधी बैठका इ . गोष्टींना सुरुवातही केलेली दिसते . त्यातही युती किंवा आघाडीमध्येही  यावेळी आता तरी आपल्या पक्षाला अमुक अमुक जागा मिळावी यासाठीही प्रयत्न सुरु झालेले दिसतात . श्रीवर्धन मतदार संघही याला अपवाद नाही. श्रीवर्धन मतदार संघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अवधूत तटकरे हे आहेत, तर २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत येथे राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील तटकरे शिवसेना उमेदवाराचा पराभव करुन निवडून आले होते . २००९ व २०१४ अशा दोन्ही निवडणुकांत येथे शिवसेना उमेदवारांचा पराभव झाला होता. आता तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा पराभव झाला त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे सुनील तटकरे यांना श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाकडून भरघोस पाठिंबा मिळाल्यामुळे ते निवडून आले . त्यानंतर श्रीवर्धन , म्हसळा व तळा या तालुक्यांच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखांना ताबडतोब बदला अशी मागणी गीते यांनी पक्षाकडे केल्याचे जाहीर झाले होते. या पार्श्वभूमीवरही सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये श्रीवर्धन मतदार संघाच्या जागी शिवसेना उमेदवार पराभूत झाल्याने यावेळी ही उमेदवारी शिवसेनेऐवजी भाजपाला मिळावी अशी मागणी कार्यकत्यांकडून पालकमंत्री यांचेमार्फत भाजपाकडे झाली असून तसे झाल्यास भाजपाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक हे भाजप कडून प्रमुख दावेदार असतील हे स्पष्ट आहे. तर मध्यंतरी एकदा या जागेसाठी अप्पा ढवळे यांचेही नाव पुढे आले होते. परंतु पुन्हा येथील उमेदवारी शिवसेनेलाच मिळाली तर सेनेकडून अनिल नवगणे किंवा समीर शेडगे यांची नावे चर्चिली जात आहेत. दुस-या बाजूला पाहिले तर श्रीवर्धन मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची आघाडी झाल्यास किंवा न झाल्यासही रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील असे गृहित धरले जात आहे. परंतु या परिसरांत चर्चिल्या जात असलेल्या माहितीनुसार म्हसळा तालुक्यातील फळसप येथील मूळ रहिवासी असलेल्या परंतु गेली बरीच वर्षे मुंबईस्थित असलेल्या एका उच्चपदस्थ व्यक्तीचे नावही राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून ऐकू येत आहे. इतकेच नव्हे तर श्रीवर्धन तालुक्यातील यापुर्वी लोकप्रतिनिधीत्व केलेल्या तरुण कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागण्याची इच्छा असल्याचे ऐकिवात आहे . मात्र घोडा मैदान आता जवळच आले असून येणारा काळच गणिते सांगणार आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा