खरसई , पाभरे धरण धोकादायक ; स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी खरसई धरणाच्या अपूर्ण कामाकडे दुर्लक्ष


म्हसळा : प्रतिनिधी
उन्हाळी भातशेती आणि पंचक्रोशीतील नागरिकांना पाणीटंचाई भासू नये यासाठी १९७९ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या लघुपाटबंधारे विभागामार्फत खरसई धरणाचे काम सुरू करण्यात आले , मात्र अद्याप धरणाचे काम पूर्ण झालेले नाही. धरणाच्या कामाला प्रत्यक्षात १९९५ मध्ये सुरुवात झाली . यासाठी ३ कोटी २४ लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाली होती . धरण क्षेत्रात २५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे . धरण पूर्ण होण्याआधी दोन्ही बाजूस अनुक्रमे ३.२० किमी व २.५० किमी लांबीचे कालवेही तयार करण्यात आले. मात्र धरणाचे काम पूर्ण न झाल्याने इतक्या वर्षात कालवे बुजून गेले आहेत. परिणामी शासनाचा पैसाही वाया गेल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे . खरसई , बनोटी , आगरवाडा , गणेशनगर , रेवली , पेढाबे व वरवटणे या गावांतील ग्रामस्थांनी धरणग्रस्त ७ गाव संघर्ष समिती स्थापन करून अनेकदा आंदोलने केली आहेत. २०१० मध्ये संघर्ष समितीने आमरण उपोषणाचा इशारा देताच तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी २६ डिसेंबर २०१० ला जलपूजन कार्यक्रमात धरणाचे काम पूर्ण होईल , असे आश्वासन दिले होते . लघुपाटबंधारे विभागाच्या तत्कालीन उपविभागीय अधिका - यांच्या नियोजनानुसार योजना १९९७ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने या प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत . संबंधित विभागाच्या हलगर्जीचा फटका धरणग्रस्त शेतक-यांना बसत असून शेतकरी अनुदानापासून अद्याप वंचित आहेत. यासंदर्भातील फाईल म्हसळा तालुका कृषी अधिका-यांकडून गहाळ झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील पाभरे धरणाचीही दुरवस्था झाली असून गळतीही लागली आहे. या गळतीकडे वेळीच लक्ष न दिल्यास तिवरे धरणाची पुनरावृत्ती होण्याची भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे . तालुक्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणीही जोर धरत आहे . तालुक्याचे तहसीलदार शरद गोसावी यांनी पाभरे आणि खरसई धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन केले . 


शेतीला पाणी मिळेल , गावाचा विकास होईल या उद्देशाने शेतक-यांनी स्वखुशीने प्रकल्पाला जमिनी दिल्या . परंतु शेतक-यांची घोर फसवणूक झाली आहे. 
- परशुराम मांदाइकर, खरसई येथील शेतकरी 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा