रायगड येथे वैद्यकीय महाविद्यालय वर्षभरात मंजूर करून द्या - खासदार सुनिल तटकरे यांची संसदेत मागणी
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
लोकसभेत इंडियन मेडिकल काऊन्सिल विधेयकावर झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूच्या खासदारांनी आपली मते मांडली. या विधेयकातील त्रुटींवर रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी भाष्य केले. हे विधेयक सर्वसमावेशक नसून नर्सेस तसेच इतर संलग्न शाखा यातून वंचित रहात आहेत, ही बाब त्यांनी प्रामुख्याने मांडली. डॉक्टर्सना शिकत असतानाच शहरी तसेच ग्रामीण भागात सेवा पुरवण्याचे प्रशिक्षण बंधनकारक करण्याची आवश्यकता असून नवोदित डॉक्टर्सच्या स्थलांतरावर कायमस्वरूपी व ठोस उपाययोजना करण्यात यायला हवी, असे मत तटकरे यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच, राज्याचे अर्थमंत्री असताना तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात जे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले होते, त्याला केंद्र सरकारने मंजुरी देऊन पुढच्या वर्षभरात हे वैद्यकीय महाविद्यालय पूर्णत्वास आणावे, अशी मागणी त्यांनी यावेळी संसदेत उपस्थित केली. शिवाय, सभागृहात असलेल्या डॉक्टर खासदारांचा समावेश या मेडिकल काऊन्सिलमध्ये करून घ्यावा असेही त्यांनी सुचवले.

Post a Comment