श्रीवर्धन : आनंद जोशी
श्रीवर्धन येथील भुवनाळे तळ्याची दुरवस्था झाली असून याकडे दुर्लक्ष होत आहे. खा. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे शासना कडून उपलब्ध झालेल्या निधीतूनसुमारे दोनकोटीरुपये खचून श्रीवर्धन नगर परिषदेने शहराच्या पूर्व प्रवेश द्वारापाशीच असलेल्या जुन्या पुराण्या भुवनाळे तळ्याचे सुंदर सुशोभीकरण केले . त्यामुळे नागरिक आणि पर्यटक यांचेसाठी बसण्याचे एक सुंदर स्थळ उपलब्ध झाले. याचा लोकार्पण सोहळा तत्कालीन आ. सुनील तटकरे यांचे अध्यक्षतेखाली व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते दि . ८ जानेवारी २०१८ रोजी मोठ्या थाटामाटांत झाला होता. तेथे लोकांना बसण्यासाठी बेंचेस , लहान मुलांसाठी घसरगुंडी सारखी काही खेळणी , इलेक्ट्रिक दिव्यांचा झगमगाट , फुलांच्या कुंड्या , हिरवळ इ . सर्व केल्यामुळे तेथे अतिशय प्रसन्न वातावरण झाल्यामुळे नागरिक व पर्यटक तेथे सायंकाळी फिरायला जाऊ लागले. ठेकेदाराने सुशोभिकरणाचे कामही चांगले केले होते . परंतु आता तेथे पावसामुळे भयंकर दुरवस्था झाल्याचे दिसते . विशेषतः उत्तरेच्या बाजूला तलावाची भिंत व एस . टी . आगाराच्या आवाराची भिंत यामधून एक ओढा वहात आहे . बागेच्या भिंतीला पाण्याच्या निच -यासाठी मधून मधून छिद्रे ठेवलेली आहेत . पण ती खूप लहान असल्याने व लाद्यांचा उतार थोडा दक्षिणेकडे असल्याने शेजारच्या नाल्याचे पाणी बागेत उत्तर बाजूला साचून रहाते . तेथे शेवाळामुळे बुळबुळीतपणा आल्याने व्यायामासाठी सायंकाळी तेथे फिरायला येणारे लोक पाय घसरुन पडण्याची शक्यता खूप वाढली आहे . तसेच भिंतीपलीकडे असलेल्या दोन वडाच्या मोठ्या वृक्षांच्या फांद्या तलावावर इतक्या वाकल्या आहेत की काही दिवसांनी त्या पाण्याला स्पर्श करतील . त्यामुळे तेथे पानांचाही खच पडलेला असतो , याकडे नगरपरिषदेने त्वरीत लक्ष देण्याची मागणी होत आहे .
तलावाच्या आवारात येथे पूर्वे स एक इमारत सुरुवातीपासून बांधण्यात आलेली आहे . ती कॉफी हाऊस म्हणून किंवा कैंटीन म्हणून बांधण्यात आली आहे असे म्हणतात . परंतु गेल्या दीड वर्षांत तेथे वरील पैकी काहीही सुरू झालेले दिसत नाही. हळूहळू ती इमारत मोडकळीसही येऊ लागेल . नगर परिषदेने वरील दोन्ही बाबींची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .

Post a Comment