शहरात राहून गावासाठी झटणारा अवलिया - डॉ. राजेश पाचारकर




डॉ. राजेश पाचारकर मित्रांसोबत राबवत आहेत समाजोपयोगी उपक्रम.
पाचारकर मित्रमंडळाच्या वतीने सॅनिटरी नॅपकीन शालोपयोगी वास्तूचे वाटप

दिघी ( गणेश प्रभाळे ) 

समाजात आज कितीही गरीब वा श्रीमंत असला तरी प्रत्येकाचा उद्देश हा पैसा मिळविणे हा आहे. गरीब दोन वेळच्या हातातोंडाची गाठ पडावी यासाठी पैसा मिळवितात. तर उच्चभ्रु पुढच्या पिढयांच्या ऐश आरामासाठी पैसे मिळवतात. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील डॉ राजेश पाचारकर हे त्यास अपवाद आहे. त्यांनी आठ गावांतील विद्यार्थी व रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवत गेली दोन वर्षे मदतीचा हात देत समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. पैसा हेच सर्वस्व नसल्याचे ते दाखवुन देत आहेत.


बोर्लीपंचतन येथील डॉ. राजेश पाचारकर यांच्याशी संवाद साधल्यावर मिळालेली माहिती अशी, शहरातील आरोग्य सेवेच्या तुलनेत ग्रामीण भागातुन रुग्णांना सुविधा मिळत नसल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहेत. यामुळे खेड्या - पाड्यातील सर्वसामान्य रुग्ण आजाराला बळी पडत आहे. त्यामुळे गावासाठी काहीतरी करण्याची तळमळ मनात होती त्यासाठी मकरंद जाधव, समीर परकर, शंकर गाणेकर, सतीश रोटकर, सुजय कांबळे, हेमंत किर, धवल तवसालकर व दिनेश चोगले अशी समविचारी मित्र भेटले त्यातूनच ही सेवा जनजागृती व विविध विधायक उपक्रमांनी सुरु झाली. त्यासाठी 'डॉ. राजेश पाचारकर मित्रमंडळ' यांच्या वतीने विविध आजारावर शिबीर घेण्यात आले. व पुढील उपचारासाठी मदत केली.

डॉ. पाचारकर यांनी नुकतेच दिनांक 8 ते 9 या दोन दिवसात बोर्लीपंचतन परिसरातील शाळांना भेटी दिल्या. शालेय विद्यार्थींना त्यांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन करत उपयुक्त असणाऱ्या ‘सॅनिटरी नॅपकीन’ व शालेय उपयोगी वस्तूचे वाटप केले. या उपक्रमामध्ये भरडखोल, दिवेआगर, वडवली, आदगाव, दांडगूरी, श्री मोहनलाल सोनी विद्यालय व नानासाहेब कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय बोर्लीपंचतन अशा एकूण सात शाळा मधील 1 हजार मुलींना आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले. याशिवाय गरीब व हुशार अशा 28 विद्यार्थिनींना शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. वृषाली साळुंखे यांचे सहकार्य लाभले.


डॉ. पाचारकर यांनी पुढे सांगितले की, ही सामाजिक चळवळ पुढे अशीच सुरू असताना पत्नी आरती पाचारकर सदैव साथ देत असते. सोबत चांगले मित्रही भेटत आहेत. सध्या कामानिमित्त शहरात असतो मात्र, गावी वैद्यकीय शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना मदत, मार्गदर्शन शिबिर असे उपक्रम राबवले जातात. या कार्यक्रमात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो मी व पत्नी तसेच समविचारी मित्रांच्या सोबतीने हे कार्यक्रम घेतो.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा