संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
तालुक्यात एकूण शाळा १२५ असून जि. प. प्राथमिक शाळा १०२, माध्यमिक शाळा २० , प्रा. खाजगी अनुदानित १, प्रा.विना अनुदानीत १ व उच्च माध्यमिक स्वयं अर्थसहाय्य १ आहेत. या सर्वावर नियंत्रण ठेवणाऱ्या गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक ही पदे व तालुक्यातील अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा वाजला आहे.त्यामुळे विविध शैक्षणिक उपक्रम व अभियान केवळ सोपस्कार ठरतात असे जाणकारांचे मत आहे.तालुक्यांत गट शिक्षण अधिकाऱ्यांसह विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख , मुख्याध्यापक, पदवीधर व उपशिक्षक अशी रिक्त पदांनी तब्बल शंभरी गाठली आहे.तर रजेवर जाणाऱ्यांची संख्याही नेहमी बऱ्यापैकी असते. आज सुध्दा १५ते २० शिक्षक रजेवर आसल्याची शिक्षण विभागाची माहीती आहे.
समग्र शिक्षा अभियान,विद्यार्थी शाळेपासून वंचीत न रहाणे , समावेशीत शिक्षण, स्वयं मूल्यांकन, अध्ययन स्तर अहवाल असे अनेक उपक्रमांची शिक्षण विभागांत व्याप्ती आहे. परंतु त्याची तपासणी मुल्यांकन, मार्गदर्शन या अभावांमुळे राबविलेले उपक्रम दर्जेदार होत नसल्याची पालकांचीही तक्रार असते.
"शासनाने आता यापुढे ‘सर्व शिक्षा’ अभियानऐवजी ‘समग्र शिक्षा’ अभियान राबविण्याचे सुरवात केली आहे. त्यानुसार शासनाने सर्व शिक्षा अभियानाचे एकत्रीकरण करून ‘समग्र शिक्षा’ अभियान योजनेची निर्मिती केली आहे. हे अभियान पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या मुलांसाठी सुरू करण्यात आले परंतु शासनाने कार्यालयीन अधिकारी कर्मचारी व आवश्यक शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरणे आवश्यक आहे"
-दादा कांबळे , निवृत्त प्रा. शिक्षक
"वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थ्यांची प्रगती आणि शाळा गुणवत्तेच्या आलेखाचा निकष समोर ठेवून शिक्षकांच्या - कौशल्याचे वार्षिक मूल्यांकन करण्याच्या प्रक्रिये मुळे शिक्षकांचे उत्तरदायित्व निश्चित केले जाते, शिक्षण प्रणालीमधील निष्ठा आणि पारदर्शकता अधिक स्पष्ट होते या प्रक्रियेत शिक्षकांना सामावून घेताना भीतीचे वातावरणनसते,मूल्यांकनाचे मूळ विद्यार्थी आणि गुणवत्ता विकासासाठी असते या साध्या सूत्राचा शिक्षकानी आभ्यास करुन दर्जेदार अध्यापन करणे गरजेचे आहे."
-महादेव पाटील, माजी सभापती, म्हसळा.
राज्य शासनाचे पावित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात पदवीधर शिक्षक भरती प्रक्रिया सुरु आहे त्यावेळी आपल्या तालुक्याची पदवीधर रिक्त पदे भरली जातील, समायोजन प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्या नंतर जिल्ह्यांतून उपशिक्षक भरले जातील"
-संतोष शेडगे, (प्र ) गट शिक्षण अधिकारी. म्हसळा

Post a Comment