बोर्लीपंचतन : अभय पाटील
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी ७ ते ८ भटकी कुत्री चुकून वाट हरविलेल्या सांबराच्या पिलाचा मागोवा घेत त्याला ओरबाडून मारण्याचा प्रयत्न करीत आल्याचे तेथे उपस्थित नागरिकांनी पाहिले . नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून कुत्र्यांना हिसकावून लावले व सांबराच्या पिल्लाला ताब्यात घेतले . श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सध्या किरकोळ पर्यटक असल्याने समुद्र किनारी असणारे जीवरक्षक प्रितम भुसाणे , तसेच ग्रामस्थ अरफान बाक्कर , अर्षद बोदलाजी , रविंद्र दवटे यांनी ७ - ८ भटके कुत्रे समुद्राच्या काठावर पाण्यामध्ये एका छोट्या प्राण्याचा माग करीत त्याच्या वर हल्ला करीत असल्याचे पाहिले . त्यांनी लगेचच त्याठिकाणी धाव घेत भटक्या कुत्र्यांना हटकून लावले व पाण्यामध्ये पळणाऱ्या सांबराच्या पिल्लाला शिताफीने पकडले . पाण्याच्या बाहेर काढल्या नंतर सांबराच्या मानेला कुत्र्यानी चावा घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावचे सरपंच उदय बापट यांच्या मदतीने त्यांनी वनखात्याच्या कर्मचा-यांना सदर प्रकार सांगितला तत्काळ काही वेळा नंतर वनरक्षक दीपक शिंदे , वनरक्षक भास्कर राठोड , बुराण शेख , दिनेश गिराणे घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी सांबराच्या पिल्लाला ताब्यात घेतले व दांडगुरी येथील पशुधन विकास अधिकारी मानसिंग शिसोदे यांनी त्या सांबराच्या मानेला झालेल्या दुखापतीवर प्राथमिक उपचार केले व वनखात्याच्या कर्मचा-यानी सांबराच्या पिल्लाला सुखरूप श्रीवर्धन मार्गावरील हुनरवेली गावच्या छोट्या जंगलात सोडून दिले .

Post a Comment