विद्यार्थी, नागरिकांना नाक दाबून प्रवास करावा लागतो
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील गावागावात स्वच्छता मोहीम राबवून गावे स्वच्छ केली जातात. त्याचप्रमाणे शहरात देखील दरवर्षी संप्रदाय, विविध संस्था यांच्या माध्यमातून स्वछता केली जाते. परंतु आता काही महिन्यांपासून शहारच्या मुख्य रस्त्यांवर, गटारे, नाले, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये परिसर अशा सर्वच ठिकाणी घाणीचे व दुर्गंधी चे साम्राज्य पहायला मिळत आहे.
म्हसळा शहरातील गटारे बांधकाम करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आलेल्या ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आहे. गटारे बांधकाम करताना कित्येक वर्षांपासून गटारात साचलेली घाण, दुर्गंधी कचरा बाहेर काढण्यात आला आहे परंतु पंधरा दिवसांपूर्वी काढून ठेवलेला कचरा अद्याप पर्यत उचलला नसल्याने नागरिकांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर दिघी नाका ते खुद्द नगरपंचायत कार्यालय पर्यत कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत. त्याचबरोबर मुख्य रस्त्यावर मराठी शाळा नंबर - 1 आहे. या शाळेच्या गेट समोरच कचऱ्याचे ढीग साठवून ठेवले आहेत. आता शाळा सुरू झाल्या असून शाळेत येताना विद्यार्थ्यांना, शिक्षाकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर हा कचरा मुख्य रस्त्यावर काढून ठेवला असल्याने येथून जाणाऱ्या गाड्यांना सुद्धा अडचणीचे ठरत आहे व कचऱ्यामुळे ट्रॅफिकची समस्या देखील वाढत आहे.
या समस्येबाबत नगराध्यक्षा फलकनाझ हुर्झुक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की हा कचरा उचलण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे त्यांनी तो उचलला पाहिजे होता. यावरून नगरपंचायत आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी हा कचरा साठवून ठेवला आहे त्या शाळेच्या भिंतीवर आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छते बाबत विविध संदेश, सुविचार म्हसळा नगरपंचायत ने काही महिन्यांपूर्वी लिहलेले आहेत. परंतु भिंती रंगवणाऱ्या म्हसळा नगरपंचायतला पंधरा दिवसांपासून साठवून ठेवलेला कचरा उचलायला वेळ मिळत नसल्याने "म्हसळा शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले' असल्याचे दिसून येत आहे.
"आमच्या दुकानासमोर गटाराचे काम केलेले आहे परंतु गटारावर झाकण नसल्याने दुकानात ये जा करताना ग्राहकांना अडचणीचे होत आहे. तसेच दुकानाच्या बाजूला आणि मराठी शाळेच्या समोरच कित्येक दिवसांपासून कचरा साठवून ठेवल्याने दुर्गंधी होत आहे.तरी या प्रकारात नगरपंचायतने लक्ष घालून कचरा उचलला पाहिजे.
श्री.प्रशांत चव्हाण, स्थानिक व्यावसायिक
"शहराच्या मुख्य रस्त्यावर कचरा साठवून ठेवला असल्याने रस्त्यावरून येता जाता अपघात होत आहेत. तसेच गटारे उघडी असल्याने त्यात पडण्याची भीती आहे. कचरा उचलण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे तो त्यांनी उचलायला पाहिजे.
श्री.रुपेश कांबळे, म्हसळा शहर रहिवासी
"शहरातील गटारे बांधकाम करण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर साठवलेला कचरा उचलण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सांगितले आहे. परंतु त्याने तो उचलला नाही. जर ठेकेदाराने कचरा उचलला नाही तर कारवाई करण्यात येईल.
श्रीमती फळकनाझ हुर्झुक, नगराध्यक्षा , नगरपंचायत म्हसळा

Post a Comment