श्रीवर्धन बस स्थानक समस्यांचे आगार ; उशिरा सुटणाऱ्या गाड्या , अस्वच्छतेचे साम्राज्य.
श्रीवर्धन प्रतिनिधी
श्रीवर्धन बस आगार सध्या अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असून , प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत . उशिराने सुटणाऱ्या गाड्या, स्थानकात घाणीचे साम्राज्य , उनाड गुरांचे बस्तान , अस्वच्छ स्वच्छतागृह , प्रचंड दुर्गंधी अशा एक ना अनेक समस्यांमुळे हे बस स्थानक समस्यांचे आगार बनले असून, प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे . श्रीवर्धन बस स्थानक हे तालुक्याच्या मध्यवर्तीय ठिकाणी आहे . त्यामुळे तालुक्यातील प्रवासी तसेच पर्यटकांना नेहमीच ते सोईस्कर होत असते . परंतु आजच्या घडीला या बस स्थानकामध्ये अनेक समस्या भेडसावत आहे . लांब पल्ल्याच्या गाड्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे उशिरा सुटत असतात . त्यामुळे प्रवासी व पर्यटक वेळेत पोहचता येत नाही . शहरामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत . शिवाय शाळा , महाविद्यालये , न्यायालय , उपजिल्हा रुग्णालय , श्रीवर्धन नगरपरिषद , पंचायत समिती , इत्यादी महत्त्वाच्या कार्यालय असल्याने खेड्यापाड्यातील नागरिक दररोज मोठ्या संख्येने येत असतात . शिवाय येथे मुख्य बाजारपेठ असल्याने खरेदी विक्रीसाठी मोठी गर्दी असते . मात्र या सर्वाना समस्यांचा सामना करावा लागतो . काही महिन्यांपूर्वी श्रीवर्धन बस स्थानकाचे नुतनीकरण करण्यात आले होते . प्रवासी व पर्यटकांसाठी शौचालय बांधण्यात आले , परंतु आजमितीला त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य झाले असून परिसरात दुर्गंधी पसरलेली असते शिवाय मोकाट गुरे रात्रीच्यावेळी स्थानकातच बस्तान मांडून बसतात . त्यात स्थानक परिसरात घोड्याची लिद व मोकाट गुरांचे मलमूत्र पसरलेले असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते . शिवाय लिद तसेच गुरांच्या मलमूत्रावरुन पाय घसरुन पडण्याची भीतीही निर्माण झाली आहे . सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत . हे पाणी स्थानकासमोरील भागात मोठ्या प्रमाणात साचून राहते . पाणी वाहून जाण्याची कोणतीही व्यवस्था केली गेली नसल्याने काही वेळा गुडघाभर पाणी साचत असते . एसटी बस आली की हेच साचलेले पाणी हे प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याने प्रवाशांचे कपडे खराब होतात . कधी कधी वादाची स्थिती उद्भवते . वीजेचा लपंडावही सुरु असतो . अशा एक ना अनेक समस्या या प्रवासी , पर्यटकांना सतावत आहेत . तरी पेण विभागीय कार्यालयाच्या विभागीय नियंत्रकांनी याची गांभीर्याने दखल घेऊन , या गैरसोयी दूर कराव्यात अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरत आहे .

Post a Comment