BLOG : Ajay Gandhi
अनेक वर्षे झाली कोकणात जातोय! एसटी नेपण भरपूर वेळा गेलोय. शनिवारी सुटी घेऊन पहाटेच्या बसने श्रीवर्धन, मुरुड इथे जायचे, उतरल्याबरोबर दुसऱ्या दिवसाच्या परतीच्या बसचे आरक्षण करायचे. अर्धा शनिवार आणि अर्धा रविवार कोकणात घालवायचा आणि रविवारी रात्री परतून सोमवारी ऑफिस ला हजर अशी कसरत खूपदा केली आहे, नंतर गाडी आल्यावर अख्ख कोकण पालथे घातले तरी अजून बरेच फिरायचे बाकी आहे. एव्हढे फिरायचे करण कोकणावरचे प्रेम आणि त्याचे पाहिले आकर्षण म्हणजे समुद्र! समुद्राशी खेळायचे, दंगा-मस्ती करायची, स्वतःला घुसळून घायचे मग त्याच्या किनाऱ्यावर त्याचे ना ना रंग- ढंग पाहत बसायचे, वेळ सत्कारणी लागतो!
गाडी आल्यावर सुरूवातीला तीर्थक्षेत्राला भेटी दिल्यासारखे दोन-तीन जागी जायची घाई केली पण नंतर मात्र एकाच जागी थांबून आराम करायला लागलो.
इतक्यात दिवे आगारास जाणे बरेचदा झाले. स्वछ समुद्र किनारा, अस्सल कोकणी खाद्य पदार्थ, शांत वातावरण, हिशोबी, शिस्तबद्ध कोकणस्थ मंडळी ह्यामुळे इथं जाण्यास पहिली पसंती आहे. नेहमी जात असल्याने ,केळकर ह्यांच्या साकेत गेस्ट हाऊस इथेच थांबतो.
अदमासे तीन फूट उंचीच्या जोत्यावर वसलेले, पुढे सारवलेले आंगण, पडवी, तीन सरळ खोल्या ,मागे स्वछ परस असलेले घर राहायला मिळते आणि जमिनीवरच्या घरात राहण्याचे स्वप्न त्या दिवसात पूर्ण होते.
सकाळी फिरणे, दर्याशी दंगामस्ती नंतर दडपे पोहे भाजलेल्या पोह्याच्या पापडा सह नाश्ता करून दांडेकर-धारप अश्या भागाशी सुसंगत अश्या लेखकाची कादंबरी वाचावी मग साडेबारा-एकच्या सुमारास केळकर-बापट अश्या घरी जेवायला जावे, बिरड्याची उसळ, फणसाची भाजी, नाजूक पापड, पातळ पोळ्या, चिंचगुळाची आमटी, आमरसात शिजवलेल्या सारणाचे मोदक खाऊन, सोलकढी पिऊन भर दुपारी शतपावली करून, भरलेल्या पोटाने जेवणास न्याय देईल अशी तासभर पडी टाकावी!
उठल्यावर परत कादंबरीशी तद्रूप व्हावे, मग हरेश्वरास, श्रीवर्धनास चक्कर मारावी, रात्र पडल्यावर परत यावे, अंगणात खुर्च्या टाकून चांदणे आणि जाणारी-येणारी विमाने( त्यांचे लाईट्स) न्याहाळावे आणि परत कादंबरी वाचत झोपावे......निवांतपणा अजून काय असतो ?
आपलाच अज्जू!
अश्या समोर बदलत जाणाऱ्या लाडक्या कोकणाविषयी अजून काही पुढील लेखात ....
आपले लेख / ब्लॉग / कविता आम्हाला पाठवा - mhaslalive@gmail.com वर


Post a Comment