ग्रामीण भागांची वाहतुक एस टी वर अवलंबून
एस टी कर्मचारी अनेक समस्यांनी ग्रस्त
म्हसळा अरुण जंगम
चला म्हसळा ,माणगाव ,कोलाड ,पेण मुंबई ... मास्तर हा जेवणाचा डबा माझ्या नातवाला द्या ...उन्ह वाढतंय एस टी केव्हा येईल ...दररोज आमच्याच गाडीच नाटक ...गाडी सुटलीच पाहिजे ... माझा पास आहे मी येतो पाठी मागून एस टी ने तुम्ही जा .. हे परवलीचे शब्द एस टी स्थानकाच्या परिसरात ऐकायला मिळतात . आज एस टी ची वाहतुक आहे म्हणून आम्ही नियमित गाव ते तालुका ये जा करतो .मात्र गाडी वेळेवर न आल्यास मानसिक त्रास सहन करावा लागतो .परंतु उशिरा का होईना पण एस टी नियमित येते असे गौळवाडी तालुका म्हसळा येथील कृष्णा दिवेकर यांनी सांगितले .
आज एस टी विषयी चिकित्सकपणे अवलोकन करतांना ग्रामीण भागातील शेतकरी ,कामगार , सरकारी नोकरदार ,शालेय विद्यार्थी व एस टी यांचे अतूट नाते असल्याचा प्रत्यय येतो. राज्यस्तरीय पातळीवर होणाऱ्या वाहतुक स्पर्धेत आपले अधिराज्य अबाधित ठेवण्यासाठी एस टी ने नाविन्याचा स्वीकार केला आहे . संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती नंतर महाराष्ट्रातील जनतेच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता त्यासाठी एस टी महामंडळाची स्थापना करण्यात आली . रस्ते विकास हा वाहतुकी मधील महत्त्वाचा घटक आहे परंतु एस टी महामंडळाने गाव तेथे एस टी बस हे सूत्र स्वीकारले ".बहुजन हिताय बहुजन सुखाय " या ब्रीदाला समर्पक सेवा एस टी ने अहोरात्र दिली आहे .नैसर्गिक आपत्ती , मानवनिर्मित आपत्ती , यात्रा ,महोत्सव , टपाल , ते निवडणूक सर्वत्र एस टी अविरत सेवा देत आहे .श्रीवर्धन एस टी स्थानकाची स्थापना 1974-75 ला झाली .तत्कालीन मुख्यमंत्री रेहमान अंतुले यांनी कोकण विकास च्या पॅटर्न खाली श्रीवर्धन ला सुसज्ज असे सिमेंट क्रॉंक्रेट ची वास्तू उभारली . त्या नंतर 2018 मध्ये पुन्हा स्थानक नुतनीकरणास सुरुवात झाली आहे .आजमितीस श्रीवर्धन स्थानक सुसज्ज ,रंगरंगोटी केलेले दिसत आहे .प्रवाशी वर्गासाठी प्रसाधनगृह ,महिलांसाठी हिरकणी कक्ष ,आगारातील प्रवाश्यांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था , सुव्यवस्थित स्थितीत असल्याचे दिसून येत आहे . धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून प्रवाशी वर्गासाठी पेयजलाची व्यवस्था करण्यात आली आहे .आगार व स्थानक परिसर स्वच्छ आहे . आज मितीस श्रीवर्धन आगारात चालक 83 , चालक कम वाहक 56 , वाहक 127, यांत्रिक कर्मचारी 49, व इतर प्रशासकीय कर्मचारी 27 असे 342 कर्मचारी कार्यरत आहेत .श्रीवर्धन आगाराचे नियमित सुटणारे नियते 69 असून 250 फेऱ्या ची वाहतुक 70 बसेस च्या माध्यमातून नियमित केली जाते .श्रीवर्धन आगारात आज रोजी 45 लाल ,21 सेमी व 4 शिवशाही बस उपलब्ध आहेत .श्रीवर्धन हा दुर्गम भागातील तालुका आहे .आज ही येतील ग्रामीण भागातील रस्ते पूर्णतः डांबरी करणं झालेले नाहीत .साखरोणे ,सांगवड , कोळवट ,भापट , गडबवाडी ,केळेवाडी हे रस्ते वाहतुकीस योग्य नाहीत .तरी सुद्धा या भागात एस टी ची नियमित वाहतुक चालते .रोहिणी , तुरबाडी , काळसुरी , दिघी , कुडगाव , बोर्लीपंचतन , वांजळे , सर्वा ,आदगाव , तोराडी , सुतारवाडी , कोलवट , सांगवड ही गावे पूर्णपणे वाहतुकीसाठी एस टी वरती अवलंबून आहेत .सदर मार्गावर एस टी ला चांगले सुद्धा उत्पन्न मिळते .एस टी हे महाराष्ट्रातील मोठे महामंडळ आहे .कामगारांना पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात महामंडळाला श्रीवर्धन आगारात अपयश येत असल्याचे दिसून येते .श्रीवर्धन आगारातील कामगारांना (कॅन्टीन) भोजनगृह उपलब्ध नाही .तसेच रात्र वस्तीला जाणाऱ्या चालक वाहकांच्या विश्रांतीगृहाचा गंभीर प्रश्न आहे .श्रीवर्धन आगाराचे अनेक वर्षांपासून रेंगाळलेले काम अजून पूर्णत्वास गेलेले नाही .कामगार विश्रांतीगृहातील नव्याने बांधलेल्या प्रसाधनगृहातील एक शौचालय खराब झाले आहे .स्थानकाच्या परिसरातील बांधलेल्या प्रसाधन गृहाची तरी बिकट अवस्था झाली आहे .नळ तुटले आहेत ,काचा निघाल्या आहेत .धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने बांधलेल्या प्रवाशी पेयजलाच्या टाकीची स्वच्छता सफाई कामगार करत नाहीत असे दिसून येते . कामगार अनेक अडचणींना तोंड देत असल्याचे दिसून येते .श्रीवर्धन आगाराच्या अख्यतारीत येणाऱ्या म्हसळा ,बोर्लीपंचतन व दिघी या स्थानकात प्रवाशी वर्गासाठी पेयजल सुविधा उपलब्ध नाही . म्हसळ्यातील आरक्षण कक्षा समोरील फरशी अनेक दिवसा पासून तुटली आहे मात्र अद्याप प्रशासनाने त्या कडे दुर्लक्ष केले आहे . म्हसळा व श्रीवर्धन स्थानकांच्या परिसरात खाजगी अनधिकृत वाहतुक राजरोज पणे चालते परंतु त्या कडे एस टी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे .आजच्या स्पर्धेच्या युगात एस टी ला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नाविन्याचा स्वीकार करून पावले टाकावी लागणार आहेत .श्रीवर्धन आगारातील सर्व नियते नियमित सोडली जातात मात्र काहे नियते उशिरा सुटतात त्यामुळे प्रवाशी जनतेचे हाल होतात .वाहतुक कोंडी , तांत्रिक बिघाड व मनुष्यबळाचा अभाव या सर्वांचा परिणाम एस टी च्या वेळापत्रका वर होतो .
श्रीवर्धन आगारात वाहकां वापरत असलेले ट्रायमॅक्स मशीन 2009 साली खरेदी केलेले आहेत .मशीन चे सर्व भाग खराब झाले आहेत . वाहकांना कामगिरी बजावताना अनेक अडचणी येतात परंतु प्रशासन लक्ष घालत नाही .तसेच ट्रायमॅक्स कंपनी कडून तिकिटासाठी देण्यात येणारे रोल अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत .त्यामुळे तिकिटावर प्रिंट व्यवस्थित येत नाही...
-लक्ष्मण पाटील ( कामगार संघटना ...सचिव श्रीवर्धन आगार )
श्रीवर्धन आगारातील रात्री वस्तीला जाणाऱ्या चालक वाहकांला रात्र वस्तीला असंख्य अडचणी ना सामोरे जावे लागते .कोळवट वस्ती चा अपवाद वगळता इतर सर्व रात्र वस्तीला उघड्यावर नैसर्गिक विधीला जावे लागते .पावसाळी गवत वाढल्यास जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते .रात्र वस्तीला मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत ...
-संदीप गुरव (एस टी कामगार सेना ..अध्यक्ष श्रीवर्धन )
श्रीवर्धन आगारातील चालकांना देण्यात येणाऱ्या बसेस चे मेंटेनन्स व्यवस्थित नसते .लहान लहान बाबी कडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे रस्त्यावर बस नादुरुस्त होतात.
-प्रवीण मोहिते (चालक श्रीवर्धन आगार )
श्रीवर्धन आगारातील सर्व नियते नियमित सोडली जातात .वाहतुक ,कर्मचारी कमतरता या मुळे अपवादात्मक परिस्थितीत एखादे नियत उशिरा सुटते .या उन्हाळी हंगामात आम्ही जवळपास नियमित 3000 किमी दररोज जादा वाहतुक केली आहे .प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सेवा पुराव्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत .पुढच्या महिन्यात विभाग बदली झालेल्या वाहकांना कार्यमुक्त केल्यावर त्याचा थोडा फार परिणाम वेळापत्रकावर होऊ शकतो .तरी सुद्धा आम्ही सर्वोत्तपरी चांगली सेवा निश्चित देऊ.
-रेश्मा गाडेकर ( आगार प्रमुख श्रीवर्धन आगार )
श्रीवर्धन आगारातुन फक्त दोन च बसेस पुण्याला सोडल्या जातात त्यामुळे पुणे मार्गावर नवीन जादा बसेस सोडल्या जाव्यात . तसेच सदरच्या बसेस सेमी करण्यात याव्यात.
- चित्रा मधुकर ढवळे ( वैद्यकीय विद्यर्थीनी श्रीवर्धन )
श्रीवर्धन ते दापोली हे जुने टायमिंग पुनः श्रीवर्धन आगारातून चालू करण्यात यावे .जेणे करून दापोली येथील विविध शालेय शिक्षणा साठी गेलेल्या विदयार्थ्यांना गावी येण्यासाठी सोपे पडेल.
-(अनघा महेश बिवलकर विद्यर्थिनी बी .फार्मसी)




Post a Comment