बातमीदार - आदेश पयेर/भावेश माळी
रविवार दि. १२ मे २०१९ रोजी रा. जि. प. प्राथमिक मराठी शाळा, खरसई येथे आजी माजी विद्यार्थी-शिक्षकांच्या भेटीचा "आठवणींचा ओलावा" हा कार्यक्रम पार पडला. शिक्षण आणि कामानिमित्त बाहेर गावी असणारे विद्यार्थी व बदलीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेले शिक्षक यांची कित्येक वर्षांनी भेट व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून खरसई येथील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमासाठी खरसई शाळेत सेवा केलेले माजी शिक्षक तसेच शाळेत शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मनोभावे सहभाग घेतला होता. कार्यक्रमास ५०० हुन अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
आपले जुने शिक्षक कित्येक वर्षांनी भेटणार म्हणून सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित झाले होते व तितक्याच तन्मयतेने आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी शिक्षकांनी सुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता माजी शिक्षक व गावातील प्रतिष्ठीत मान्यवरांच्या हस्ते दीप-प्रज्वलनाने झाली.
खरसई येथील विद्यार्थिनींनी सुरेल स्वरात स्वागतगीत व इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर शिक्षक-विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्याध्यापक जांभेकर सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेची एक आठवण म्हणून विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षकांना शाळेच्या फोटोची फ्रेम भेट म्हणून देण्यात आली व सायंकाळी 3 वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.
गुरुशिष्यातील नाते हे फक्त पुरातन काळातच नाही तर विज्ञान युगात सुद्धा अबाधित आहे याचे मूर्तिमंत उदाहरण या निमित्त खरसई शाळेच्या माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी अख्या महाराष्ट्राला दिल आहे.
प्रसंगी संतोष दरेकर सर, सुधीर वारळकर सर (आदर्श शिक्षक), अदीप गोसावी सर, संतोष शेवाळे सर-(आदर्श शिक्षक), प्रविण करडे सर (आदर्श शिक्षक), दिनेश रांगळे सर, धनाजी देसले सर (आदर्श शिक्षक), उसमान शेख सर, किरण पाटील सर, शीतल बुधनवरकर मॅडम, गुंड्रे मॅडम, करंबे सर, करंबे मैडम, बालकृष्ण भायदे सर, सुनील उमरोटकर सर (आदर्श शिक्षक), जांभेकर सर (आदर्श शिक्षक) आदी शिक्षण वृंद उपस्थित होते.
तसेच शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष मा. निलेश मंदाडकर, खरसई आगरी समाज अध्यक्ष पांडुरंग खोत, भालचंद्र म्हसकर, महादेव नाक्ती, सोमजाई माता क्रीडा मंडळाचे संस्थापक चंद्रकांत खोत , शाळा व्यवस्थापन कमिटी माजी अध्यक्ष नरेश कतळकर, जनार्दन पयेर, भालचंद्र पयेर, जनार्दन खोत, देवजी खोत आदी मान्यवर उपस्थित होते.
रोहन माळी, किशोर पयेर, आदेश पयेर, आतेश पयेर, देविका कातळकर, दिनेश शितकर, कल्पेश शितकर, दर्शन शितकर, भावेश माळी, जयंत पाटील, दीप्ती गणेकर, पूजा शहा, अशोक म्हात्रे गीतांजली मेंदडकर, आदित्य मांदाडकर आदी माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
स्वत:ला प्रगतीपथावर नेताना समाज देखिल कसा प्रगती करेल याचा विचार करा....!!!
तुम्ही सारे युवा आहात. युवा काय करू शकतो हे काव्यात सांगतो.
सळसळते रक्त ज्यांचे फुरफुरते बाहू।
स्फूर्ती आणी उत्साहाचे रुप तिथे पाहू
अंधार दाटता अज्ञानाचा लावितो जो दिवा।
आधार या देशाचा नाव त्याचे युवा।
सारे विद्यार्थी एकत्र आलात ही मोठी शक्ति आहे. त्या शक्ती चा वापर या समाजासाठी कसा होईल हा विचार कृतीमधे आणला तर हे एकत्र येणे सार्थकी लागेल.
आदर्शच शोधायचे असतील तर आमच्या. देशात आदर्शवत माणसांची कमतरता नाही.24 वर्षे आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सचिन झगमगीत दुनियेत निष्कलंक कसा राहिला हे महत्त्वाचे आहे . आयुष्यात पर्याय ठेवा. मी डाँक्टर नाही झालो. मी इंजिनिअर नाही झालो. म्हणून आयुष्य संपविणे हा विचार कधीच मनात आणू नका.कारण तुमचे पालनपोषण करणारे पालक ,नातेवाईक मित्र यांचे काही तरी देणे आपण लागतो.म्हणून जीवन संपविण्याचा खोटा विचार स्वप्नात दे खिल करु नका
आपण करित असलेल्या उपक्रमातून मला दिसून येते की पुढिल 10 वर्षात या तालुक्याचे नेतृत्व खरसई गाव करेल या बद्द्ल माझ्या मनात संदेह नाही.
-प्रवीण करडे, माजी शिक्षक रा. जि. प. प्राथमिक मराठी शाळा, खरसई






Post a Comment