श्रीवर्धन प्रतिनिधी
बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे श्रीवर्धन शहरात वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळत आहे . मात्र याकडे नगरपरिषद प्रशासनासह वाहतूक पोलिसांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असून , त्याचा नाहक त्रास पादचारी , नागरिकांना सहन करावा लागत आहे . बेशिस्ट वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होत नसल्यामुळे त्यांचे फावले असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे . श्रीवर्धन शहरातील बाजारपेठ , टिळक मार्ग व वाणी आळी या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे . शहरातील व तालुक्यातून आलेले दुचाकीस्वार आपल्या दुचाकी वेड्यावाकड्या व वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभ्या करुन मच्छी किंवा भाजी घेण्यासाठी तसेच अन्य दुकानात जात असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात . बाजारपेठेतील भाजी दुकानदार दुकानांच्या पुढे प्लॅस्टीकचे टब लावून त्यावर भाजीच्या टोपल्या ठेवल्या जातात . त्यामुळे रस्त्यावरील दोन ते तीन फूट जागा व्यापून जाते . अगोदरच रस्ते अरुंद असल्यामुळे दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर वाहतूक कोंडी होतेच . मच्छी मार्केटजवळ नगरपरिषदेची जागा आहे , त्याठिकाणी अन्य खाजगी वाहने उभी केलेली आढळून येतात . नगरपरिषदेने त्याठिकाणी वाहनतळ निर्माण करण्याची आवश्यकता आहे . श्रीवर्धन शहरात वाहतूक नियमनासाठी केवळ दोन वाहतूक पोलीस तैनात असतात . व्हीआयपी बंदोबस्त असल्यानंतर त्यांना बंदोबस्तासाठी बोलावल्यानंतर श्रीवर्धन शहरातील वाहतूक नियोजन वा - यावर सोडले जाते . जागोजागी मार्गदर्शक फलक लावलेले असूनही येणारे पर्यटक प्रत्येक ठिकाणी वाहन उभे करुन पत्ता विचारतात , त्यामुळेसुध्दा वाहतूक कोंडी होते . वाहतूक पोलिसांनी अडविल्यानंतर अनेकजण त्यांच्याजवळ हुज्जत घालतात . अशा महाभागांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे . वाहतूक कोंडीमुळे पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी पंधरा मिनिटे लागतात . नगरपरिषदेने रस्त्यावर सामान ठेवणारे दुकानदार व भाजीच्या टोपल्या रस्त्यावर मांडणारे भाजी विक्रेते यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे . नगरपरिषदेत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी रबर स्टॅम्पसारखे न बसता या गोष्टींची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे . जनतेनेसुध्दा आपल्या प्रभागातून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीजवळ संपर्क साधून अशा गोष्टी निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत . पोलिसांनीही दुचाकीस्वारांवर कारवाई केल्याशिवाय वाहतूक कोंडी कमी होणार नाही , असा सूर नागरिकांमधून उमटत आहे .

Post a Comment