श्रीवर्धनमधील पर्यटनवाढीसाठी विशेष योजना , उपक्रमांची गरज


श्रीवर्धन प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी शासनाने विविध योजना व उपक्रम तसेच निधीची तरतूद करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली  जात आहे . १९९७ साली श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावामध्ये एका नारळ सुपारीच्या वाडीमध्ये झाडाना पाणी घालण्यासाठी खोदकाम सुरु असताना एका तांब्याच्या  पेटीमध्ये सुवर्ण गणेशाची प्रतिमा सापडली . ही बातमी संपूर्ण राज्यभर व देशभर वाऱ्यासारखी पसरली , आणि त्यानंतर श्रीवर्धन तालुक्यात ख-या अर्थाने भाविक व पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला . दिवेआगर याठिकाणी येणारे पर्यटक मग श्रीवर्धन हरिहरेश्वर येथेही जाऊ लागले . यानंतर दिवेआगर येथे मोठमोठी हॉटेल्स व रिसॉर्ट तयार झाली. घरोघरी पर्यटकांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात येउ लागली. त्याचप्रमाणे श्रीवर्धन व हरिहरेश्वर याठिकाणीसुध्दा अनेक हॉटेल व रिसॉर्ट बांधण्यात आले . श्रीवर्धन तालुक्यात कोणतीही औद्योगिक आस्थापना नसल्यामुळे याठिकाणचा पर्यटन व मासेमारी हा मुख्य व्यवसाय बनला आहे . स्थानिक तरुणांना या व्यवसायामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे . संपूर्ण कोकणातील ७५२ किलोमीटर समुद्रकिनारपट्टीवर कोठेही नाही असा अंदाजे पावणेतीन किलोमीटर लांबीचा धुप प्रतिबंधक बंधारा सुशोभित करुन बांधण्यात आला आहे . माजी मंत्री सुनील तटकरे राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांच्या विशेष प्रयत्नाने या बंधा-याचे काम करण्यात आले होते . एप्रिल , मे , जून या महिन्यांत भरतीच्या वेळी श्रीवर्धन समुद्र किना-यावर डॉल्फिनचे दर्शन घडते . त्यासाठी शासनाच्या पर्यटन खात्याकडून याठिकाणी जास्तीतजास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे . हरिहरेश्वर येथे हरिहरेश्वर व काळभैरव योगेश्वरी हि पुरातन मंदिरे आहेत , या मंदिरांची स्थापना अगस्ती मुनींनी केल्याची पुराणात नोंद आहे . उन्हाळ्यात हरिहरेश्वर येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते . त्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे . पुणे येथून श्रीवर्धन फक्त १६० किलोमीटर अंतरावर असल्यामुळे पुण्याचे सर्वातजास्त पर्यटक श्रीवर्धन तालुक्यात फिरण्यासाठी येत असतात . मात्र या मार्गावर खराब रस्त्यामुळे पर्यटकांच्यातुन नाराजी व्यक्त करण्यात येते . खराब रस्त्यामुळे पर्यटकांची संख्या खुप कमी झाली आहे . श्रीवर्धन समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या बंधा - याची स्वच्छता करण्यासाठी नगरपरिषदेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे आता शहराच्या प्रवेशद्वारा जवळ येणा - या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे . दरम्यान , येथील पर्यटनवाढीसाठी शासनाने नवनवीन योजना , उपक्रम राबविण्याची मागणी स्थानिकांमधून जोर धरत आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा