खासदार झालो तरी माझे पाय जमिनीवरच राहतील - खासदार सुनिल तटकरेंचे अभिवचन



 सत्तेचा माज किंवा खुर्चीची मस्ती माझ्या डोक्यात कधीच गेली नाही - खासदार तटकरे यांचा अनंत गीतेंना टोला

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
 
   अनेक वर्षे मी राजकारणात सक्रिय असून जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, मंत्री अशा महत्वाच्या पदांवर काम केले आहे. राज्यात आघाडी सरकारच्या काळात विविध खात्यांच्या मंत्री पदांवर काम केले असून सत्तेचा माज किंवा खुर्चीची मस्ती माझ्या डोक्यात कधीच गेली नाही त्यामुळे आता जरी मी खासदार झालो असलो तरी माझे पाय जमिनीवरच राहतील असे विनम्र प्रतिपादन खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा येथील विजयी मिरवणुकीत संबोधित करताना केले आहे. 
         32 रायगड लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रथमच म्हसळा शहरात नवनिर्वाचित खासदार सुनिल तटकरे यांची भव्यदिव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासमवेत राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला तरुण वर्ग, लोकप्रतिनिधी यांनी नाचत ढोल ताशांच्या गजरात, बेंजो पथक वाजवत, फटाके फोडून भव्यदिव्य विजयी मिरवणूक काढली. विजयी मिरवणूकितील जनतेचा आनंद व उत्साह पाहून स्वतः सुनिल तटकरे यांना आनंदाश्रू अनावर झाले होते.
यावेळी खासदार तटकरे यांनी मतदारांचे आभार मानताना सांगितले की मी ज्या वेळेस पहिल्यांदा दिल्लीच्या सभागृहात जाईन तेव्हा प्रथम माझ्या डोळ्यासमोर माझ्या हक्काच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील माझी जनता डोळ्यासमोर दिसेल असे भावनिक उदगार व्यक्त करताना मी ज्या ज्या वेळेस नवीन सभागृहात जातो तेव्हा तेव्हा विरोधी पक्षाचे सरकार सत्तेत असते. 1995 ला आमदार झालो तेव्हा राज्यात शिवसेनेचे सरकार होते आणि आता 2019 ला खासदार झालो तेव्हाही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे आणि मी विरोधी बाकावर बसणार आहे. परंतु आम्ही विरोधी बाकावर असलो तरी माझ्या मतदारसंघात विकास कामे कमी होऊन देणार नाही तर पूर्वी पेक्षा अधिक गतीने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा माझा मानस असून स्व.बॅरिस्टर ए.आर अंतुले साहेब यांच्या स्वप्नातील रायगडचा विकास करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. मागील कित्येक वर्षांपासून रखडलेला मुंबई - गोवा हायवे रस्ता, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, पर्यटनाला चालना, स्थानिक तीर्थक्षेत्र विकास, तरुणांना रोजगार उपलब्ध होतील असे उद्योग व्यवसाय सुरू करणे अशी अनेक कामे करण्याचा विचार असून लगेचच या सर्वांगीण विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडून पाच वर्षात खासदार म्हणून नाही तर जनतेचा सेवक व कार्यकर्ता म्हणूनच काम करेन असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सर्वधर्म समभाव शिकवणीच्या विचारसरणीचे पालन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे स्वराज्याची निर्मिती केली हाच आदर्श मानुन आणि राष्ट्रीय नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात आपण सर्व जाती धर्मातील लोकांना समाज घटकांना सोबत घेऊनच अविरतपणे जनसेवा करीत राहणार तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गाववाडी वस्तीवर आघाडी सरकारच्या काळात शासनाच्या विविध योजनांतून केलेल्या करोडो रुपयांच्या विकासकामांची पोच पावती जनतेनी मला दिली. केंद्रात व राज्यात सत्ता नसताना देखील विद्यमान युती सरकार मधील मंत्र्यांकडून करोडो रुपयांचा विकास निधी मतदारसंघात उपलब्ध करून देण्यास यशस्वी झालो असल्याने जिल्ह्यातील जनतेचे आणि माझे नाते अतूट आहे असा विश्वास व्यक्त केला. 
तसेच माझे राजकारण किंवा समाजकारण एका समाजापुरते मर्यादित नसून आगरी, कोळी, कुणबी, मराठा, धनगर, आदिवासी अशा विविध जाती जमातीच्या व बौद्ध, मुस्लिम, शीख अशा सर्व धर्मियांच्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करणारे आहे असे सांगून रायगड, रत्नागिरीच्या जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण असे सांगून खासदार सुनिल तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेचे आभार मानले.
    यावेळी खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दाजी विचारे, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष अलीशेठ कौचाली, अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष नाझीम हसवारे, तालुका अध्यक्ष समिर बनकर, जिल्हा संघटक सुभाष करडे, सभापती छाया म्हात्रे, जिप सदस्य बबन मनवे, उपसभापती संदिप चाचले, महिला तालुका अध्यक्षा रेश्मा कानसे, नगराध्यक्षा फळकनाझ हुर्जुक, उपनगराध्यक्ष संजय कर्णिक, माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक संतोष काते, नगरसेवक करण गायकवाड, माजी सभापती छाया म्हात्रे, मधुकर गायकर, काँग्रेस आयचे नेते फजल हलदे, नासिर मिठागरे, शेकाप चिटणीस संतोष पाटील, शेकाप तालुका युवक अध्यक्ष निलेश मांदाडकर, सरपंच अंकुश खडस, शांताराम गायकर, सतिश शिगवण, यांसह नगरसेवक, नगरसेविका, सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शेकाप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


म्हसळा पाणी योजना जून अखेर पर्यंत पूर्ण झाली नाही तर अधिकाऱ्यांची गय करणार नाही - खासदार सुनिल तटकरे यांचा इशारा
     म्हसळा शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून आघाडी सरकारच्या काळात स्वतः सुनिल तटकरे यांनी मंजूर करून घेतलेली नळ पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण झालेली नाही यावरून विरोधकांनी सुनिल तटकरे यांना टीकेचे लक्ष केले होते याबाबत बोलताना तटकरे यांनी सांगितले की म्हसळा शहराची रखडलेली पावणे तीन कोटी रुपयांची मंजूर नळ पाणीपुरवठा योजना जर का जून महिना अखेर पर्यत संबंधित अधिकारी श्री.गोडसे यांनी पूर्ण केली नाही तर त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा नवनिर्वाचित खासदार सुनिल तटकरे यांनी विजयी मिरवणुकीला संबोधित करताना दिला त्याचबरोबर या अधिकाऱ्यांची गाठ माझ्याशी आहे मी त्यांना सोडणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी खडसावून सांगितले. खासदार तटकरे यांच्या कडक शब्दांनी जिल्ह्यासह म्हसळा तालुक्यातील अधिकारी वर्गाला आता चांगलाच हादरा बसणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

 पोलीस यंत्रणेचे नीटनेटके नियोजन :-
     32 रायगड लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथम खासदार सुनिल तटकरे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीच्या निमित्ताने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी व मिरवणुकीत कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून सकाळपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते त्याचबरोबर पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे हे स्वतः मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा