श्रीवर्धन शहरात पाण्याचे दुर्भिक्ष ; रोज टॅकरने होतोय पाणीपुरवठा



श्रीवर्धन शहरात पाण्याचे दुर्भिक्ष रोज टॅकरने होतोय पाणीपुरवठा न . प . कडून विविध उपाययोजनांसाठीची मागणी 

श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन हे रायगडमधील महत्वाचे शहर आहे . तालुक्यात नारळ , सुपारी , केळी इ . च्या बागा म्हणजे वाड्या आहेत , त्यामुळे तालुक्यातील रानवली येथील धरण बांधून होण्यापूर्वी गावाच्या बागायती भागात घरोघरी विहिरी होत्या . परंतु नळाचे मुबलक पाणी मिळू लागल्याने गावातील ब-याच विहिरी लोकांनी बुजवून टाकल्या असे वयस्कर लोक आजही सांगतात . त्याचे दुष्परिणाम यंदा प्रकर्षाने दिसू लागले आहे . यापूर्वीही दोन - तीन वर्षे पुरेसे पाणी न मिळाल्याने प्रत्यक्ष शहरात हजार - दोन हजार लि . क्षमतेच्या टॅकर्सद्वारा गरजेनुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागला होता . यंदा येथील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अधिक गंभीर झाली असून रानवली धरणातील पाणी पूर्णपणे संपले असून गेल्या तीन - चार दिवसांपासून श्रीवर्धन शहरांतील ज्या भागांमध्ये आवश्यक आहे , त्या - त्या भागात रँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे .  एकतर पहिल्यापासूनच न . प . ने विशिष्ट भागात मर्यादित वेळातच पाणी सोडले असते तर साहजिकच पाण्याचा साठा जास्त दिवस पुरला असता . दुसरे म्हणजे धरणातून येणारे नळाचे पाणी नागरिक बिनधास्तपणे बागांमध्ये सोडण्यासाठी किंवा वाहने धुण्यासाठी वापरताना दिसत असे , यावर न . प . ने कोणत्याही प्रकारचे नियंत्रण ठेवले नव्हते असे कळते . तिसरे म्हणजे न . प . ने धरणातील माती  खोल खणून धरण खोल केले असते किंवा खासगी मालकीच्या विहिरींची उपसणी करुन घेण्यासाठी झरे मोकळे करण्यासाठी काही आर्थिक मदत  केली असती तरी आज पाण्याचे असे दुर्भिक्ष आले नसते अशी चर्चा नागरिकांकडून ऐकू येते . काही कारणे का असेनात , परंतु पाण्याचे सध्या दुर्भिक्ष असलेल्या भागातील नागरिकांनी पावसाची वाट पहाणे , पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व जाणून घेणे व तशी कार्यवाही करणे याशिवाय अन्य मार्ग दिसत नाहीत . तसेच यापुढे तरी नगरपरिषदेने तहान लागल्यावर विहीर न खणता आधीपासूनच उपाय योजना करावी अशी अपेक्षा केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा