विविध समस्या मांडायच्या कुणाकडे नागरिकांचा संबंधितांना सवाल
म्हसळा : महेश पवार
तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आमसभा होत असते . मात्र म्हसळा तालुक्यात गेल्या पाच वर्षात आमसभाच झालेली नाही . यामुळे लोकांमध्ये कमालीची नाराजी आहे . श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे आमदार अवधुत तटकरे यांची आमसभा गेली अनेक वर्ष होत नसल्याने मतदार संघामध्ये आमदार आहेत की नाहीत असा प्रश्न जनतेमधून विचारला जात आहे . यावर्षी होणारी आमसभा होईल की नाही हे सांगता येत नसल्याने जनतेच्या हक्कासाठी असणारे प्रश्न मांडायचे कोणासमोर हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेपुढे आहे . तालुक्यामध्ये अनेक विविध विकास कामे झाली असली तरी सर्वसामान्य जनतेला भेडसावणारे प्रश्न आजही निरूत्तरीय आहेत . शासनाच्या निकषांनुसार प्रत्येक विधानसभेला आमदार दिले असताना त्या आमदारांनी जनतेचे प्रश्न आमसभांमधून समजून घेतले पाहीजेत , म्हसळा तालुक्यात अलिकडे आमसभाच झालेली नाही याबाबत संबधीत राजकर्ते देखील बोलायला तयार नाहीत , त्याच्यामध्ये पाणी अडले कुठे , हे गुलदस्तात आहे . या वर्षीच्या आमसभा होणे ही काळाची गरज आहे . आमसभा झाली तरच सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले जातील असे मत आज सामान्य जनता व्यक्त करीत आहे .
आमसभा घेण्याची आमदारांनी हिंम्मत का दाखविली नाही असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे . रस्ते , पाणी प्रश्न मिटला म्हणजे विकास झाला असे म्हणता येत नाही तर मतदारांशी संवाद साधने त्या संवादामधील असणा - या समस्या जाणून घेणे त्यांचे यथायोग्य निराकरण करणे अशी आमसभा बघायला भेटली तर आम्ही आम्हाला भाग्यवान समजू .
- नंदू शिर्के , शिवसेना म्हसळा तालुका प्रमुख
२०१४ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत आमदार अवधूत दादा तटकरे यांना निवडून दिले . कुशलतेच्या माणसाला विधानसभेत पाठवून दिले परंतु काही प्रश्न सुटलेले नाहीत.
-मतदार , म्हसळा तालुका
राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सुनील तटकरे यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये आपला स्वतः पुतण्या आमदार म्हणून निवडून आणला परंतु आजपर्यंत त्याला कोठे ठेवले व कसे ठेवले अथवा कोणी ठेवले हे आजही सुनील तटकरे स्पष्ट करू शकले नाही , त्यामुळे आमदार दाखवा आणि बक्षिस मिळवा असेच म्हणावे लागणार आहे .
-डॉ . मईज शेख , म्हसळा काँग्रेस पक्ष अध्यक्ष ,

Post a Comment