तलावांतील गाळ काढणे, विंधन विहिरींची कामे त्वरित संपवा
--जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी
म्हसळा प्रतिनिधी
कोकणात पावसाचे प्रमाण खूप असले आणि या भागात दुष्काळ जाहीर झालेला नसला तरी विशेषत: रायगड जिल्ह्यात जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे त्याठिकाणी विनाविलंब टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे तसेच गाव तलावांतील गाळ काढणे, विंधन विहिरींची कामेही त्वरितहाती घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. सध्या रायगड जिल्ह्यात ६० गावे आणि २०३ पाड्या अशा २६३ ठिकाणी २७ टँकर्ससुरु आहेत.
टंचाईग्रस्त गावांवर लक्ष्य केंद्रित
सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दररोज राज्यातील विविध जिल्ह्यांच्या सरपंचांशी संवाद सेतू बैठकीच्या माध्यमातून बोलत असून त्यांच्या अडचणी समजावून सांगत आहेत तसेच प्रशासनाला देखील तातडीने पाउले उचलण्याचे निर्देश देत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी यांनी सबंधित यंत्रणांच्या बैठका घेऊन रायगड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांवर पूर्णपणे लक्ष्य केंद्रित केले आहे. या बैठकांना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, जिल्हा कृषी अधिकारी पी बी शेळके उपस्थित होते
मागणी येताच विनाविलंब टँकर
सध्या एकूण २७ टँकर्स जिल्ह्यात सुरु असून सर्वाधिक ६ टँकर्स पेण मध्ये तर पोलादपूर आणि महाड मध्ये अनुक्रमे ५ आणि ४ टँकर्स सुरु आहेत. पेण मध्ये १५ गावे आणि ७१वाड्या अशा ८६ गावांना, महाड मध्ये १२ गावे आणि ५५ वाड्या अशा ६७ गावांना तर पोलादपूरमध्ये १३ गावे आणि ४५ वाड्या अशा एकंदर ५८ गावांना हे टँकर्स सुरु आहेत. कर्जत तालुक्यात १९ गावांसाठी ३ टँकर्स सुरु आहेत. सुधागड-पाली येथे ३ वाड्यांना १ टँकर, आणि श्रीवर्धन येथे ३ गावांना १ टँकर सुरु करण्यात आले आहेत.
उरण, पनवेल, खालापूर, रोहा, माणगाव , मुरुड आणि तळा या तालुक्यांत प्रत्येकी एक टँकर सुरु आहे. अलिबाग, म्हसळा येथे एकही टँकर सुरु करण्याची गरज सध्या नाही. मागणी वाढत जाईल तसतसे टँकर्सही वाढविण्यात येत आहेत
मुरुड आणि पनवेल मध्ये १ खासगी विहीर व बोअरवेल अधिग्रहित करण्यात आली आहे.
जलयुक्तची कामे मे अखेरपर्यंत संपवा
2016-17 मध्ये 37 गांवे निवडण्यात येऊन प्रस्तावित 966 कामे पूर्ण झाली आहेत सदर कामांमुळे निर्माण झालेला पाणीसाठा 3393 टीसीएम इतका असून निर्माण झालेले सिंचन क्षेत्र 265 हेक्टर इतके आहे.
2017-18 साठी 110 गांवे निवडण्यात आली असून 1468 कामे पूर्ण झाली आहेत सदर कामांमुळे निर्माण झालेला पाणीसाठा 4540 टीसीएम इतका असून निर्माण झालेले सिंचन क्षेत्र 474 हेक्टर इतके आहे.
आता 2018-19 साठी एकूण 69 गांवांची निवड करण्यात आली आहे. प्रस्तावित 1017 कामांपैकी 199 कामे पूर्ण झाली असून 512 कामे प्रगती पथावर आहेत. जिल्हाधिकारी यांनी सर्व उर्वरित कामे मे अखेर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
जलसंधारण उपचारांमुळे फायदा
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या विविध कामांमुळे जिल्ह्याच्या तलाव क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे विशेषत: कृषी विभाग, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग यांनी तातडीने जलयुक्त शिवारच्या अनुषंगाने मधील कामे हातावेगळी करून एक उत्तम उदाहरण निर्माण केले पाहिजे असे जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. जलसंधारण उपचारांमुळे भुगर्भातील जलपातळी वाढतांनाच जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो. त्यामुळे साहजिक पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन उत्पादकता वाढते. गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या जलसंधारण उपचारानंतर भात आणि नागली पिकाची हेक्टरी उत्पादकता वाढली होती.
शेतकऱ्यांना दुबार पिकासाठी मदत करा
रायगड जिल्ह्यातील शेतकरीही आता दुबार पिक पद्धतीकडे वळत असून भाजीपाला लागवडीकडेही शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येत आहे. शिवाय भाजीपाल्याला स्थानिक बाजारपेठही उपलब्ध असते ही गोष्ट लक्षात घेऊन शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन आणि पाण्याचे उत्तम नियोजन करून देण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
तलावांतील गाळ काढण्यावर भर द्या
१५ तालुक्यांत गाव तलावांतील गाळ काढण्याची कामेही वेगाने हाती घेऊन संपविण्याची गरज आहे त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी तातडीने अंमलबजावणी करावी व आहवाल द्यावेत असेही जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत.
ग्रामीण पाणी पुरवठा अपूर्ण कामे त्वरित संपवा
रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारीतील कामे सुरु झाली असली तरी अपूर्ण कामे देखील तातडीने संपविण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपाययोजना प्रत्यक्ष राबविण्यास सुरुवात केली.

Post a Comment