म्हसळेकरांची पाण्यासाठी दाही दिशा वण- वण : आज संघर्ष समीतीचा मोर्चा.


पाणीपुरवठा योजना नवीन व सुधारीत व्हावी यावर असणार भर 

संजय खांबेटे : म्हसळा 

     म्हसळा शहरांतील नगरपंचायत हद्दीतील  पाणी प्रश्न दिवसें दिवस  गंभीर होत असतानाच नगरपंचायत प्रशासन करीत असलेला पाणीपुरवठा सपत्नीक भावनेने, सदोष करीत असतानाच Ceo च्या चुकीच्या धोरणामुळे जनतेवर आर्थिक भार येत आहे. प्रशासनाचे महसुल विभागाने  नगरपंचायत प्रशासन,  पदाधिकारी व संघर्ष समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते आजपर्यंत  नगरपंचायतीकडून तहसीलदार म्हसळा याना पाणी वाटपा संदर्भातील ठोस उपाय योजना तसेच म्हसळा नगरीतील सर्व नागरीकाना सम प्रमाणात , स्वच्छ, शुद्ध व पिण्यास योग्य पाणी पुरवठा व्हावा या संघर्ष समीतीच्या न्याय्य मागणीवर तोडगा व उपाय योजना करण्यास नगरपंचायत प्रशासन असमर्थ ठरल्याचे सांगण्यात आल्याने  मंगळवार दि. १४ रोजी सकाळी ११ वा. मोर्चाचे नियोजन केले असल्याचे अध्यक्ष सुशिल यादव यानी सांगितले.
     म्हसळा नगरपंचायत हद्दीत मागील चार वर्षाच्या कालावधीत माहे मार्च ते जून या कालावधीत भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. ही पाणी टंचाई कृत्रिम  व भ्रष्टाचारासाठी आसल्याचा दावा संघर्ष समितीचा आहे. या पाणी टंचाई वर उपाययोजना म्हणून मंजूर नळ पाणी पुरवठा योजना व तिच्या पाठ्पुराव्याकडे दुर्लक्ष करून मुख्याधिकारी अनावश्यक विंधण विहिरी खणत असून त्यातील दूषित पाण्याचा पुरवठा शहरातील बहुतांशी भागात करीत आहेत. त्यामुळे शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. शहरात दररोज  ७० हजार लीटर टँकरने ( १ हजार लीटर क्षमतेचे पिक अप ) पाणी पुरवठा करण्यात येत आहे असे नगर पंचायतीचे म्हणणे आहे, त्यामध्ये मुख्याधिकारी यांचे अर्थपूर्ण राजकारण स्पष्टपणे दिसत आहे. शासनाचे पाणी पुरवठा बाबतचे दर व निकषाप्रमाणे बील मंजुर न करता, Ceo अवाच्या सवा दराने पाणी पुरवठा करीत आहेत .असा  आरोप करण्यात आला. या भ्रष्टाचाराची सुद्धा सखोल चौकशी व्हावी अशी मागणी संघर्ष समीती करीत असताना, भविष्यात योजनेत फिल्टर फ्लँट, जास्त क्षमतेच्या स्टोअरेज टँक, शहरातील उंच सखल पणा गृहीत धरून वितरण व्यवस्था असावी या साठी संघर्ष समीती पाठपुरावा करणार आहे.
     "शहरातील कन्याशाळा परीसर, विद्यानगरी , ब्राह्मण आळी, सानेआळी , साळीवाडा, तांबट आळी सोनार आळी, नवे नगर, तहसील- पोलीस कार्यालय, दिघी नाका, ग्रामिण रुग्णालय, तहसील निवासस्थान , पंचायत समित कार्यालय, काजी मोहल्ला, खोंडा, हुजुक, कुंभारवाडा अशा बहुतांश परिसरांत नगरपंचायतीच्या नळाने पाणी नसल्याचे सांगण्यात आले."

 "नगरपंचायत प्रशासनाने रोज वितरीत करण्यात येणारे ७० हजार लीटर पाणी टाकीत टाकून वितरीत करावे ह्या नागरीकांच्या मागणीकडे नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष दिलीप कांबळे दुर्लक्ष का करतात.?-नदीम दफेदार, माहीतीआधीकारी कार्यकर्ता, म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा