कडेकोट बंदोबस्तात होणार मतमोजणी ; १८०० कर्मचारी, पोलीस तैनात



जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांची पत्रकार परिषद

म्हसळा प्रतिनिधी
नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात २३ मे रोजी होणारी मतमोजणी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणार असून पोलीस व इतर सुरक्षा दलाच्या जवानांसह सुमारे १८०० अधिकारी- कर्मचारी हे मतमोजणी यशस्वीरीत्या पार पाडण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांना आज दिली. या पत्रकारपरिषदेस निवासी उप जिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले उपस्थित होते

मतमोजणीची रंगीत तालिम  बुधवार २२ मे रोजी जिल्हा क्रीडा संकुल नेहुली येथेच होणार आहे. निवडणूक आयोगाकडून आणखीही दोन निरीक्षक यादिवशी मतमोजणीच्या ठिकाणी असतील. निवडणूक निकाल फेरीनिहाय सर्वसामान्य जनतेला कळावा म्हणून उद्घोषणा व्यवस्था करण्यात आली आहे.  

६ विधानसभा मतदारसंघ निहाय होणाऱ्या प्रत्येक मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल असणार आहेत. त्यानुसार एकुण लोकसभा मतदार संघाच्या १५६ फेऱ्या होणार आहेत.

सर्वाधिक फेऱ्या २८ महाड आणि सर्वात कमी फेऱ्या २३ गुहागर या विधानसभा मतदारसंघाच्या होणार आहेत.

३२ रायगड लोकसभा मतदारसंघासाठी अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड,दापोली, गुहागर अशी एकूण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये  एकूण १६,५१,५६० मतदारांपैकी १०,२०,१४० मतदारांनी मतदान केले आहे.

एकुण ६१.७६ टक्के मतदान झालेले आहे. 

अशी होणार मतमोजणी

मतमोजणी ठीक सकाळी ८ वाजता सुरू केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबल निहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

सर्व विधानसभा मतदारसंघातील ८४ टेबलनिहाय पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसरी फेरीची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. सर्वप्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत.

३२ रायगड लोकसभा मतदारसंघात ईटीपीबीएसचे एकूण १४०५ मतदार व पोस्टल बॅलेटचे एकूण ९३९९ असे एकुण १०८०४ मतदार आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत अनुक्रमे ७५५ व ४८०५ असे एकुण ५५६०  मते प्राप्त झालेली आहेत सर्व प्रथम या मतपत्रिकांची  मतमोजणी केली जाणार आहे.

टपाली मतपत्रिका मतमोजणीकरीता स्वतंत्र अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. टपाली मतपत्रिकेसाठी 8 टेबल ठेवण्यात येणार असून प्रत्येक टेबल निहाय 1 पर्यवेक्षक व 2 सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

मतमोजणीसाठी अधिकारी कर्मचारी तैनात

मतमोजणीसाठी  पर्यवेक्षक, सहा. पर्यवेक्षक, सुक्ष्म निरीक्षक असे ३६० जण  असणार आहेत याव्यतिरिक्त संगणक कामासाठी, इव्हीएम स्ट्राँगरूममधून आणणे, त्यांची सुरक्षा, टपाली मतपत्रिका मतमोजणी सुक्ष्म निरीक्षक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणीच्या २१ समित्यामधील कर्मचारी असे २३ मे रोजी याठिकाणी आपली जबाबदारी सांभाळणार आहेत.

सुरक्षा कक्षातून विधानसभा निहाय मतमोजणी कक्षातील 1 ते 14टेबलवर ईव्हीएम  वाहतुकीसाठी  तीन टप्यात पाठविण्यचे  नियोजन करण्यात आलेले  आहे.  
पहिला टप्पा – स्ट्राँग रुमपासून ते प्रवेशद्वार, दुसरा टप्पा- प्रवेशद्वारापासून  मधून मतमोजणी प्रवेद्वारापर्यंत, तिसरा टप्पा मतमोजणी प्रवेशद्वार ते मतदार संघ निहाय 1 ते 14  टेबलपर्यंतविनाव्यत्यय अखंडपणे वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

6  विधानसभा मतदार संघ निहाय  इव्हीएम  सुरक्षा कक्षात  स्वतंत्र सिलबंदकरण्यात आलेले आहे.

सुरक्षा कक्षातील ईव्हीएम  मतमोजणी कक्षात अचुकरित्या पाठविण्यासाठी  तहसिलदार दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आलेलेआहेत.

तसेच सुरक्षा कक्ष ते मतमोजणी कक्ष दरम्यान ईव्हीएम  वाहतुकव्यवस्थापनाकरीता उपजिल्हाधिकारी दर्जाच्या  अधिकाऱ्यांची नियुक्तीकरण्यात आलेली आहे.

निवडणुक आयोगाच्या निकषानुसार स्ट्राँग रुमला त्रिस्तरीय सुरक्षा बंदोबस्त व्यवस्था पुरविण्यात आलेली आहे.

याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी पथकाला विशिष्ट रंगाचे टीशर्टस तसेच बॅचेस देण्यात येणार आहेत जेणे करून कुठलाही संभ्रम होणार नाही

नियमित तपासणी

सूरक्षा कक्षाची सुरक्षितता व बंदोबस्त तपासण्याकरीता स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी दररोज सकाळी व संध्याकाळी भेट देतात व उपजिल्हाधिकारी  ते तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची सुध्दा रात्रंदिवस आठ तासांची ड्युटी नेमून दिलेली आहे. प्रवेश करणाऱ्या व सुरक्षा कक्षाची पाहणी करणाऱ्या प्रत्येक अधिकारी यांचे चित्रीकरण स्वतंत्र कॅमेराद्वारे करण्यात येते.  

मतमोजणी केंद्र परिसरात ९० सीसीटीव्हीचे जाळेअसून शिवाय टेहळणी मनोरे देखील आहेत. यावरून जवान २४ तास अतिशय बारकाईने नजर ठेवून असतात.

क्रीडा संकुल येथे कडक पोलीस बंदोबस्त असून मतमोजणीच्या दिवशी देखील अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या  व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक,मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.

मतमोजणीच्या अनुषंगाने प्रसार माध्यम प्रतिनिधींना महत्वपूर्ण सुचना

३२- रायगड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी ही येत्या गुरुवारी ‍२३ मे २०१९ रोजी होणार आहे. ही मतमोजणी जिल्हा क्रीडा संकुल नेहुली, अलिबाग  येथे सकाळी ८ वाजेपासून सुरु होईल.

या मतमोजणीचे यथायोग्य वार्तांकन होण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत  प्रसार माध्यम प्रतिनिधींना आवश्यक असणारी प्राधिकारपत्रे यापूर्वीच देण्यात आली आहेत. सदर प्राधिकारपत्रे असणा-या माध्यम प्रतिनिधींनाच मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश देण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. 

मतमोजणी कक्षालगत स्वतंत्र प्रसारमाध्यम कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. जिल्हा माहिती अधिकारी रायगड यांच्या पर्यवेक्षणाखाली पत्रकार, वृत्तवाहिणीची प्रतिनिधी, वृत्तपत्र निवेदक  इत्यांदीशी समन्वय साधून त्यांना मतमोजणी निकालीची माहिती पुरविणे. मतमोजणी माहितीची प्रसिद्धी करणे. प्रसार माध्यमांशी समन्वय ठेवणे. याबाबतचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच त्या ठिकाणी Computer, Printer, Xerox, Telephone, TV set, Fax इ.सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.

वरील अनुषंगाने मतमोजणी केंद्रालगतच्या परिसरात प्रसार माध्यम प्रतिनिधींना प्रवेश देण्याच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे :

१) निवडणूक आयोगाच्या प्राधिकारपत्रे  धारकांनाच मतमोजणी केंद्रालगतच्या परिसरात प्रवेश देण्यात येईल; तसेच इतर कोणत्याही ओळखपत्राचा विचार यासाठी केला जाणार नाही.

२)  प्राधिकारपत्रावर उल्लेख असेल त्याच मतदारसंघाशी निगडीत मतमोजणी केंद्र परिसरात संबंधित प्रतिनिधीला प्रवेश दिला जाईल.

३) प्रसार माध्यम प्रतिनिधी/ छायाचित्रकार, वाहिन्यांचे कॅमेरामन यांचे ४ ते ५ जणांचे गट करून त्यांना सकाळी ९ नंतर मतदान केंद्रात प्रत्यक्ष मतमोजणीच्या कव्हरेजसाठी आणले जाईल. एका प्रतिनिधीस एकाच वेळी प्रवेश दिला जाईल तसेच केंद्रातील निश्चित केलेल्या ठिकाणावरूनच कव्हरेज करता येईल.

४) या कव्हरेजदरम्यान छायाचित्रण (Photography) किंवा चलत्-छायाचित्रण (Videography) करताना कॅमेरा स्टँड/ ट्रायपॉड वापरता येणार नाही तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष इव्हीएममधील मतमोजणीचे छायाचित्रण करता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

५) या दरम्यान केंद्रातील 'थेट चित्रिकरण' (‍Live Telecast) करता येणार नाही.

  ६) छायाचित्रकारांनी काढलेली केंद्रातील छायाचित्रे किंवा चित्रीकरण हे मोडतोड करून किंवा छेडछाड करून सोशल मिडीया किंवा इतर कुठल्याही मीडियातून प्रसिध्द न करण्याची काळजी घ्यावी. असे झाल्यास व्यक्तिगत जबाबदारी निश्चित करून सायबर कायद्यान्वये योग्य ती कारवाई करण्यात येईल.   

७) फेरीनिहाय निकाल अधिकृतरित्या जाहीर केल्यावर जिल्हा माहिती अधिकारी व संपर्क अधिकारी यांच्या माध्यमातून लगेचच माध्यम कक्षात कळविण्यात येतील.

८) मतमोजणी केंद्र परिसरात वाहनतळाची मर्यादित जागा लक्षात घेऊन प्रसार माध्यम प्रतिनिधींनीची वाहने किंवा ओ.बी. व्हॅन इत्यादी परिसराबाहेर आपल्या जबाबदारीवर लावणे अपेक्षित असेल, याची कृपया नोंद घ्यावी.

९) निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांना उचित वाटेल त्याप्रमाणे परिस्थितीनुसार माध्यमांच्या कव्हरेजबाबत निर्णय घेऊ शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा