रायगड मध्ये मनसेची भूमिका महत्त्वाची ; रायगड मतदारसंघात २५ ते ३० हजारांची व्होट बँक मनसेकडे


प्रतिनिधी : म्हसळा लाईव्ह
भाजपला सत्तेतून खाली खचण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी चंग बांधला असून , राज्यात त्यांनी भाजपविरोधी प्रचाराचा झंझावात उभा केला आहे . राज ठाकरे यांच्या सभांना लाखोंच्या संख्येने गर्दी होत आहे . त्यांच्या भूमिकेचा फायदा महाआघाडीच्या उमेदवारांना थेट होणार आहे . यामुळे राज्यात युतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे . या पार्श्वभूमीवर शुक्रवारी १९ एप्रिल रोजी राज ठाकरची महाड येथे सभा पार पडणार आहे . रायगड लोकसभा मतदारसंघात जवळपास २५ ते ३० हजारांची व्होट बँक मनसेकडे असून , या सभेला जिल्हाभरातील नागरिक उपस्थित राहणार आहेत . या सभेकडे सभेनंतर राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले असून , हि सभा रायगडच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार असल्याचे त्यांचे मत आहे ,  रायगड लोकसभा मतदारसंघात १६  उमेदवार नशीब आजमावत असून , खरी  लढ़त युतीचे उमेदवार केद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते व महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनिल तटकरे यांच्यात होणार आहे. दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत रंगत असल्याने , या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ने अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस या स्टार प्रचारकांच्या सभा पार पडल्यानंतर, शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राज ठाकरे यांची सभा महाड येथील चांद मैदानात पार पडणार आहे . या सभेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे सरकार कसे फसवे आणि खोटारडे आहे यावर त्यांचा भर राहणार असल्याचे बोलले जाते . भाजपला मतदान करु नको असा थेट हल्ला त्यांनी आधीच्या आपल्या सभांमध्ये केला आहे. महाडमध्येही घणाघात होणार असल्याने सभला गर्दी होणार आहे . आघाडीला मतदान करा असे ते थेट सांगत नसले तरी या सभांचा थेट फायदा आघाडीच्या उमेदवारांना होणार असल्याचे चिन्ह आहे . यामुळे शिवसेनेचे अनंत गीते यांच्यावर राज ठाकरे कसा निशाणा साधणार याचीही उत्सुकता मतदारांमध्ये आहे . आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मनसेचे स्थानिक पदाधिकारी , कार्यकर्ते मतदारांच्या गाठी - भेटी , रॅली , प्रचार सभांना आघाडीच्या पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्यासह उपस्थित राहत असल्याचे दिसून येते . मनसने यापूर्वी रायगड लोकसभेची जागा लढलेली नाही . पेण विधानसभा मनसे लढली होती. ग्रामपंचायत पंचायत समिती , जिल्हा परिषद नगर पालिका निवडणुकीत मनसेचे इंजिन धड़धडले होते . त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात मनसेने ब-यापैकी प्रस्थ निर्माण करण्यास गेल्या काही वर्षांपासून सुरुवात केलेली आहे . मुरुड , पेण , रोहे , माणगाव , महाड , पोलादपूरमधील काही ग्रामपंचायतीत मनसेचे सदस्य आहेत . तर खेड नगरपरिषदेत मनसेचा नगराध्यक्ष आहे . रायगड लोकसभा मतदारसंघात मनसेकडे  सुमारे २५ ते ३० हजारांच्या आसपास व्होट बँक आहे . त्यामुळे मनसेचे महत्त्व वाढले आहे . यामुळे राज ठाकरेंची सभा रायगडच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे . 

सभेबाबात महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह....
राज ठाकरे सभेच्या व्यासपिठावरुन भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करीत असल्याने महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे . तर युतीचे कार्यकर्ते मात्र डोक्याला हात मारुन घेत आहेत . रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राज ठाकरे यांना माणणारा मोठा वर्ग आहे यामुळे या सभेचा फायदा महाआघाडीला होण्याची चिन्हे आहेत 

चलचित्रफितींची रंगू लागली चर्चा... 
भाषणादरम्यान भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना राज ठाकरे पुरावा म्हणून भाजप नेत्यांनी यापूर्वी दिलेली आश्वासने , केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या चलचित्रफितींचा वापर करीत आहेत . या चलचित्रफिती सभेदरम्यान सादर करुन , पुराव्यांसह भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांची कशी दिशाभूल केली हे उपस्थितांना पटवून देत आहेत . यामुळे महाड येथील सभेत राज ठाकरे कोणत्या चलचित्रफिती दाखवणार याची सर्वत्र चर्चा रंग लागली आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा