टीम म्हसळा लाईव्ह
कोकणात आंब्याबरोबरच काजु हे फळही तितकेच महत्वाचे असून , रायगड जिल्ह्यातही काजू मोठ्या प्रमाणात पिकवले जाते . मात्र काजूगर प्रक्रियेसाठी लागणारे भांडवल छोट्या छोट्या उद्योजकांना दिल्यास प्रचंड रोजगार निर्मिती होईल . मात्र , हे भांडवल सुशिक्षीत बेरोजगार उद्योजकांकडे नसल्यामुळे जिल्ह्यातील काजूगर प्रक्रिया उद्योगाला खीळ बसली असून , तरुण उद्योजकांपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे . या उद्योगाला पुरेसे भांडवल नसल्याने बेरोजगारांची भटकंती कायम राहली आहे . 'आई जेऊ घालेना आणि बाप भिक मागू देईना' अशी अवस्था बेरोजगारांची झाली आहे .
जिल्ह्यातील पोलादपूर , महाड , म्हसळा , श्रीवर्धन , तळा , माणगाव , रोहा , सुधागड , कर्जत या तालुक्यात प्रामुख्याने काजू पिक मोठ्या प्रमाणात पिकते . रायगड जिल्ह्यात काजू बागांचे क्षेत्र ३ हजार १२५ हेक्टर आहे . या वेंगुर्ला एक : चार , सहा : सात व आठ या काजू पिकाच्या जाती असून वेंगुर्ला चार या जातीची काजू झाडे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत . या झाडाला सरासरी चार ते पाच वर्षे लागवडीपासून फळ देण्यास वेळ लागतो . एक झाड चौदा ते वीस किलो सरासरी काजू बियांचे उत्पादन मिळवून शेतक - यांना देत असते . रायगड जिल्ह्यात तीन हजार एकशे पंचवीस हेक्टर क्षेत्राची नोंद काजू पिकाची असली तरी जंगल व अन्य ठिकाणीही काजूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत . यांच्या झाडापासून ६२ हजार ५०० मेट्रिक टन काजू बिया मिळू शकतात . त्यापासून १५ हजार ६२५ किलो निव्वळ काजूगर विक्रीसाठी निघू शकतो . एवढ्या मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन होते . काजू हे पिक नाशिवंत नाही . त्यामुळे ते उशिराही बाजारात पाठविले तरी चालते . मात्र जिल्ह्यात काजूगर उद्योग प्रक्रिया अत्यल्प असल्यामुळे शेतकरी , काजू बागायतदार याकडे गांभीर्याने बघत नाहीत . त्यामुळे शासनही या उद्योगप्रक्रियेकडे लक्ष देत नाही . रायगड जिल्ह्यात काजू या पिकाला दुय्यम स्थान मिळते . गत पाच वर्षांपूर्वी महाड , माणगाव , रोहा या तालुक्यात शासनाच्या कृषी विभागामार्फत छोट्या - छोट्या उद्योजकांना काजूगर उद्योग उभारणीसाठी अनुदान दिले होते . परंतु ते अनुदान लाभार्थ्याच्या उद्योग प्रकल्पाच्या पंचवीस टक्के असल्यामुळे काही कालावधीसाठी ही उद्योग प्रक्रिया चालवण्यात असमर्थता दर्शवली मात्र , पुरेसे व मुबलक लागणारे भांडवल नसल्यामुळे हे उद्योग प्रक्रियाला खीळ बसली आहे . जिल्ह्यात काजू उत्पादन जानेवारी अखेरपासून ते मे महिन्यापर्यंत होते . मात्र ही उद्योग प्रक्रिया सरासरी मार्च ते डिसेंबर दहा महिन्यापर्यंत चालते . एका टनामागे अडीचशे किलो , काजूगर निव्वळ उत्पादन विक्रीसाठी मिळते . सध्या या काजुगरांचा एक हजार रुपये ते बाराशे रुपये सरासरी भाव बजारात किलोसाठी चालू आहे . हा उद्योग सुरु करण्यासाठी व उद्योजक सुशिक्षित बेरोजग र यांना शासनाने व बँकांनी विशेष भरीव अर्थसहाय्य दिल्यास रायगड जिल्ह्यात या व्यवसायाला भविष्यकाळात सुगीचे दिवस येतील व रायगड जिल्हा राज्याच्या व देशाच्या नकाशावर काजूगरांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल , सध्या या काजूगरांना विविध सण , हॉटेल्स व श्रीमतांचे खाणे म्हणून बघितले जाते . याला प्रचंड मागणी आहे .

Post a Comment