आठवणींच्या हीदोंळयावर.....! 36 वर्षानी भरला इयत्ता १० वी चा वर्ग......!!!


स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित न्यू इंग्लिश स्कुल म्हसळा येथील १९८२ - ८३ च्या १० वी च्या मुला - मुलींनी तब्बल ३६ वर्षांनी साजरा केला गेट टुगेदर कार्यक्रम त्याबद्दल दोन शब्द .......

रमेश म्हात्रे यांच्या ब्लॉगवरून....
सन १९८३ जून महिन्यात १० वीचा रिझल्ट लागला आणि प्रत्येकजण आपापल्या वाटा / मार्ग शोधण्यात जे एकमेकांपासून दुरावले ते अजूनही काही भेटलेले नाही ....
काही दिवसांपूर्वी शनिवार दिनांक ४ एप्रिल २०१५ रोजी यांतील एक मित्र दिलीप पाटील (धुळे) याने व्हाट्सप्प वर "मस्ती नाय तर दोस्ती नाय" नावाचा ग्रुप तयार केला ... उद्देश होता आपले वर्गमित्र पुन्हा एकदा एकत्र यावे  !
सुरुवातीस संपर्कात असलेले ५ - ६ मित्र यांनी मनाशी चंग बांधला कि काहीही करून एक एक करत आपले वर्गमित्र शोधून काढायचेच, काहीही करून त्यांच्या पर्यंत पोचायचेच या उद्देशाने सगळे पछाडले होते ! एकदा ठरवलं कि ते हट्टाने करायचेच त्याशिवाय सुटका नाही हि वेळोवेळी शिक्षकांनी केलेली सुचनावजा ताकीद कामी आली ..... दिवसेंदिवस मित्रांची यादी वाढतच होती ; आतपर्यंत ६३ विद्यार्थी - विद्यार्थिनींपर्यंत पोचण्यात यशस्वी झालो आहोत ! 
यातच गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दिलीप पाटील यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी धुळे येथे मित्रांना निमंत्रित केले त्यास बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला हे पाहताच त्याच महिन्यात रमेश म्हात्रे यांच्या मुलाच्या लग्नाचे औचित्य साधून रमेश म्हात्रे यांनी देखील सगळ्यांना खरसई येथे निमंत्रित केले त्यास देखील भरगच्च प्रतिसाद मिळाला. आणि यातुनच गेट टुगेदर कार्यक्रम व्हावा हि कल्पना जोर धरू लागली होती आणि त्यातूनच या कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजन यशस्वी झाले. यासाठी प्रकाश घरत,  प्रकाश करडे, रमेश म्हात्रे, रमेश लोकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश म्हात्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आज हयात नसलेले मित्र आणि शिक्षक यांना श्रधांजली वाहिली गेली ; तदनंतर सर्व वर्गमित्रांची ओळख परेड करण्यात आली, प्रत्येक मित्राने आपापले मनोगत व्यक्त केले, एकमेकांच्या सुख - दुखात यापुढे हि एकजूट अशीच दाखवू हे मनी ठासवत आणि मित्रांनी आणि मैत्रिणींनी एकमेकांकरता आणलेल्या वस्तूंची देवाणघेवाण करत अधूनमधून प्रत्येकाने आणलेल्या खाद्य पदार्थांचे आस्वाद घेत प्रत्येकजण प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद लुटत होता ..... आनंद हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असलेला स्पष्टपणे जाणवत होता . सदर कार्यक्रमाकरता सौ. सीमा हरिन्द्रन या केरळहून तर श्याम जैन,  रमेश लोकरे हे पुण्याहून हजर राहिले होते हे विशेष. याशिवाय महाड, मुंबई, ठाणे, पनवेल,  म्हसळा, खरसई, वारळ, काळसुरी, पाभरे, श्रीवर्धन, नागोठणे, पेण, माणगाव, लोणेरे, पाश्टी आणि आसपासच्या परिसरातून मित्र - मैत्रीणी वेळात वेळ काढून जमा झाले होते. 
पूर्वीचे विद्यार्थी असलेले मित्र मैत्रीणी आज कोणी शिक्षक, शिक्षिका, छोटे मोठे स्वतंत्र व्यावसायिक, शासकीय आणि खाजगी कंपनी अधिकारी,  तर काही आपला परंपरागत चालत आलेला शेतकी व्यवसाय यात पारंगत झाले आहेत. असे असले  तरी या ठिकाणी गरीब - श्रीमंत, लहान - मोठा असा कोणताही भेदभाव दिसून आला नाही ..... आणि हिच आपल्या मैत्रीची व्याख्या आहे हे प्रत्येकाने सिध्द केले .....
या कार्यक्रमाकरिता शिवसेनेचे म्हसळा तालुका प्रमुख श्री. नंदु शिर्के यांनी म्हसळा गोरेगाव रोडवरील कासारमलई येथुन जवळच असलेल्या ताम्हीणीशिर्के येथील आपल्या फार्म हाऊसचा मुक्त वापर करण्यास परवानगी दिली होती आणि ती देखील पूर्णतः मोफत .... यावरून त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि मोठेपणाची महती स्पष्ट दिसत होती. 
आता असे कार्यक्रम दरवर्षी न चुकता करायचे आणि ज्या हायस्कूल मुळे आपण एकत्र आलो त्या शाळेसाठी काहीतरी करायचे हे मनी बिंबवत जड अंतःकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली ....! !

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा