श्री.मिठ्ठू (राहुल) त्रिंबक आंधळे
नमस्कार वाचकहो व्यक्तिविशेष या विशेष सदरात आपण नेहमीच विविध श्रेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना भेटत असतो. आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण भेटणार आहोत अँड. रेश्मा गाडेकर यांना. जाणून घेऊया त्यांचा एस.टी.वाहक ते आगार प्रमुख असा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास..
स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे.ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपारिकरित्या पुरूषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत किंबहुना त्या ती क्षेत्रे काबीज करत आहे.त्या क्षेत्रावर त्या अधिराज्य मिळवत आहेत.भारतीय तत्वाज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते.अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे.पूजा जरी पुरूष दैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या शक्तीची,त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची.आज जवळपास प्रत्येक कार्यक्षेत्रात महिला अग्रेसर आहेत.आज आपण अशाच एका सार्वजनिक क्षेत्रातील कार्यक्षेम महिला व्यक्तीमत्वा संदर्भात सन्मान करूयात.ज्या सार्वजनिक कार्यक्षेत्रात जवळपास आजपर्यंत फक्त पुरुषच काम पहात होते.ते क्षेत्र म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपल्या सर्वांची आवडती एस.टी.होय.या एस.टी.मध्ये आपल्या कार्यक्षेत्राला वाहून घेणाऱ्या व्यक्तीमत्व म्हणजे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आगाराच्या पहिल्या महिला आगार व्यवस्थापक मा.सौ.अँड. रेश्मा गाडेकर-पवार मँडम होय.मुळात लहानपणी पासूनच जिद्दी,कणखर, कोणतेही हाती घेतलेले काम सचोटीने पुर्ण करण्यासाठी परिपूर्ण तयारीने सज्ज,तयार असलेल्या व मनाने नावाप्रमाणेच रेशमी,कोमल, गुलाबी,असलेल्या मा.सौ.रेश्मा गाडेकर आहेत.
कोणत्याही प्रकारचे काम हे लहान नसते तर त्या कामाला लहान समजणारे लहान असतात. या प्रभावी विचाराच्या असणाऱ्या रेश्मा या कधीच कोणत्याही प्रकारच्या कामाला कधीच कमी महत्त्व देत नव्हत्या.त्यांना सदैव माणसांत राहण्याची,मनमिळाऊ व्रती असल्याने सर्वसामान्यांच्या सेवेसाठी त्यांनी एस.टी.मध्ये सेवा करायचे ठरवले.व म्हणूनच त्यांनी मेहनतीने अभ्यास करून फेब्रुवारी 2009 मध्ये एस.टी.ची.परिक्षा देऊन महिलांनासाठी कठीण परिश्रम असेलेल्या वाहक (कंडक्टर) या पदावर चांगल्या उत्कृष्ट गुणांनी सातारा विभागातील सातारा या आगारात निवड झाली.सातारा येथे सर्व प्रकारच्या नियतावर (ड्युटी) समाधानकारक कामगिरी करत असतांनाच विविध स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत होत्या.कारण प्रत्येकवेळी पुढे जाण्याची मनामध्ये जी जिद्द होती ती जिद्द त्यांना शांत बसु देत नव्हती.त्याच दरम्यान त्यांनी विधी विषयांवर म्हणजेच एल.एल.बी.ला प्रवेश घेतला.नियमितपणे अभ्यास करत असतांना त्यावेळेस त्यांनी आपल्या कामातून जसा वेळ मिळेल तसा वेळेचा सदुपयोग करून विधी महाविद्यालयातील विविध स्पर्धा गाजविल्या. वकिलीचा अभ्यास करत असतांना त्यांना विविध प्रकारच्या अडीअडचणीला सामोरे जावे लागले कारण कि,नौकरी आणि उच्च शिक्षणाचा अभ्यास या दोन्ही गोष्टींचा विचार करतांना,खुपच मोठी दोरीवरच्या कसरतीप्रमाणे कसरत करावी लागायची.ज्यावेळी आठवडा सुट्टी असायची त्यावेळेस आठवडाभर पडलेले वेगवेगळ्या प्रकारचे कामं हातावेगळे करायच्या.नौकरी आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा सारीपाट वर्षे 2009 ला त्यांनी यशस्वीपणे पार पाडला.वकिलीचा अभ्यास पुर्ण झाल्यानंतर त्यांनी नौकरीच्या रिकाम्या वेळी सातारा येथेच आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शिकवणी वर्ग घेतले.ते काम मोठ्या मेहनतीने व आनंदाने करत.एकदा अशाच आपल्या नियोजित कामगिरीवरून रात्री 9 च्या दरम्यान घरी येत असतांना , त्यांना एक आजीबाई खुपच थकलेल्या व रडवलेल्या चेहऱ्याने जाणवल्या त्यांनी त्यांची आस्थेने विचारपूर्वक विचारणा केली.त्यावेळेस त्या आजीला आपल्या मुलाचे घर भेटत नव्हते. त्यावेळेस घर सोधायला जवळपास 1 तासाच्या अथक, नंतर खुप प्रयत्नाने त्या आजीला त्यांच्या मुलाच्या घरी सुखरूप पोहचविले.
2009 ते 2011 पर्यंत अतिशय समाधानकारक वाहक या पदावर काम केल्यानंतर त्यांनी 2011 ला खात्यांतर्गत वाहतूक निरिक्षकाची परिक्षा दिली व त्या परिक्षेत त्या यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्या.नंतर त्यांनी सातारा येथेच वाहतूक शाखेत वाहतूक निरिक्षक या पदावर चांगल्या पद्धतीने काम केले.चांगल्याप्रकारे काम करत असतांनाच 12 एप्रिल 2015 मा.सागर पवार यांच्याशी विवाहाच्या रेशीम बंधनात अडकल्या गेला.पती मा.श्री.सागर पवार हे सध्या टाटा कंपनीच्या सातारा शाखेत अभियंता (इंजिनिअर) आहेत. पती सागर हे सुद्धा नावाप्रमाणेच सागराच्या अथांग आहेत. दोघेही नियमितपणे आपली कामगिरी करत असतांना सुखी संसार चालू असतांना गाडेकर मँडम यांची बदली 27 जुलै 2016 ला रायगड जिल्ह्यातील अलिबाग या आगारात झाली.तेथे पण त्यांनी सर्व कामगारांच्या मनात घर निर्माण करून कामगिरी केली.27 जुलै 2016 नोव्हेंबर 2017 पर्यंत त्यांनी अलिबाग येथे महत्त्वाची कामगिरी बजावली.त्यानंतर 4 नोव्हेंबर 2017 पासून त्या रायगड विभागातील श्रीवर्धन या ठिकाणी त्या श्रीवर्धन आगाराच्या पहिल्या महिला आगार प्रमुख म्हणून कामगिरी पहात आहेत. मा.सौ.गाडेकर मँडम या श्रीवर्धन आगारात आल्यापासून कर्मचारी वर्गात खुपच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेकदा त्या काही प्रसंगी पहाटे 3:00 वाजता पण उपस्थित असतात. त्यांनी आजपर्यंत आपल्या कामाला प्रथम प्राधान्य दिले आहे.त्यांनी प्रत्येक कर्मचारी वर्गाशी हितगूज साधुन त्यांच्या समस्या समजून घेऊन आगारातील कर्मचार्यांच्या मनात एक नवचैतन्याचे,आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे.तसेच आगारातील कर्मचारी हे पण त्यांना उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत.बसमध्ये कामगिरी करत असतांना झालेल्या चर्चेतून अनेक प्रवासी हे त्यांच्या संदर्भात समाधानाने बोलतात.अशा या कर्तृत्वान रणरागिणीने आपल्या कामगिरीचा ठसा सर्वत्र उमठविला आहे.आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना सन्मानपूर्वक बोलणार्या या मा.रेश्मा गाडेकर मँडम आहेत.त्यांच्या साथीला सध्या आगारात वाहतूक निरिक्षक म्हणूनही सौ.शर्वरी लांजेकर, वाहतूक नियंत्रक श्रीम.सुजाता करंबेळकर,तसेच पाच महिला वाहक पण कार्यरत आहेत. त्यांच्या संदर्भात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या कर्तव्यात कोणत्याही प्रकारचा अडसर येऊ नये म्हणून मोठ्या जड अंतकरणाने त्यांनी आपल्या फक्त 9 महिण्याच्या चि.श्लोक या चिमुकल्यास आपल्या सातारा या गावी ठेवून आपली कामगिरी मोठ्या उत्साहात पार पाडत आहेत.या रणरागिणीस जागतिक महिला दिनानिमित्त मनापासून सलाम व सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
लेखकाचे अल्पपरीचश्री.मिठ्ठू (राहुल) त्रिंबक आंधळे
(लेखक हे श्रीवर्धन आगारात वाहक आहेत तसेच सामाजिक,बालरक्षक,शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात कार्यरत आहेत...) (संपर्क 9850069474, 9975411807)

Post a Comment